Wednesday , June 7 2023
Breaking News

वेलटवाडीतील आदिवासींचे पुनर्वसन करणार; युसुफ मेहेरअली सेंटरचे डॉ. जी. जी. पारिख यांची माहिती

अलिबाग : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळात अलिबाग वेलटवाडीतील आदिवासींच्या घरांचे नुकसान झाले होते. या 23 आदिवासींचे नियोजनबद्ध पुनर्वसन व्हावे यासाठी युसुफ मेहेरअली सेंटरच्या माध्यमातून काम करण्यात येईल, अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. जी. जी. पारिख यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. वेलटवाडीतील आदिवासींच्या पुनर्वसनासंदर्भात डॉ. पारीख यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघ कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. जी. जी. पारीख यांनी ही माहिती दिली. सेंटरचे सहसचिव मधू मोहिते, उषाबेन शहा, अनिल हेब्बर, गुड्डी शा. ल., तसेच अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर,  योगेश मगर उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळात अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडीतील 23 आदिवासींच्या घरांची पडझड झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार अलिबाग तहसीलदारांनी तातडीने पत्राशेड बांधून त्यांची राहाण्याची व्यवस्था केली होती. तर खानाव ग्रामपंचायतीने स्वखर्चाने जलवाहिनी टाकून पाण्याची व्यवस्था केली होती. हे आदिवासी बांधव शेडच्या बाजूच्या वन जमिनीवर कच्ची झोपडी बांधून राहू लागले होते. मात्र वन विभागाने नोटीस बजावून व अनेकदा तोंडी सांगून या आदिवासींना सदर जागा सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे सदर 23 कुटुंबांची परवड झाली आहे. वेलटवाडी येथील आदिवासी बांधवांचे सुनियोजित पुनर्वसन व्हावे, यासाठी युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारिख यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. यावेळी 23 कुटुंबे व त्यांच्या वाढीव कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी समाज मंदिर, बालवाडीसह पर्यायी जागा द्यावी, आहे त्याच जागेवर त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत सदर जागेवरुन त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न होऊ नये, सदर आदिवासींना सनद देवून ते लागवडीत आणीत असलेल्या जमिनीची शासकीय पातळीवर नोंद करुन दखल घेतली आहे. सदर सनद प्राप्त जमिनी सातबारावर नोंद करुन त्यांना भोगवटादार करण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी तहसीलदारांना आदेश द्यावेत, अशा मागण्या डॉ. पारिख यांनी जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्याकडे केल्या. वेलटवाडी आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या आठ दिवसांत सोडविण्या येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी दिले असल्याचे डॉ. जी. जी. पारीख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply