![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/07/maka-1024x768.jpg)
उरण : वार्ताहर
पावसाळा सुरू झाल्याने ठिकठिकाणी धबधबे, डॅम ओसंडून वाहू लागले आहेत. पर्यटकांची वाढणारी गर्दी व पावसाळ्याच्या दिवसात मक्यांना असणारी मागणी लक्षात घेता ठिकठिकाणी भाजलेल्या, उकडलेल्या मक्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पांढर्या मक्यांचा हंगाम सुरू असतो. त्यामुळे पावसाळ्यात या मक्यांचा आस्वाद लहान मुले व वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण घेत असतात. धबधब्याच्या क्षेत्राजवळ, डॅमजवळ अनेक हातगाडी व्यवसायिक, भाजलेल्या मक्यांचे कणीस किंवा उकडलेल्या कणसाला तिखट, मीठ, लिंबू लावून देण्याचा व्यवसाय जोर धरत आहे. पिवळ्या रंगाचे कणीस चवीला गोड असते, तर गावठी मका रंगाने पांढरा असतो. चवही वेगळी असल्याने पावसाळ्याच्या हंगामात या मक्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्याच्या दिवसात 20 रुपये दराने मक्याचे कणीस विकले जात आहे. मक्याची कणसे भाजून अथवा उकडून खाण्यात येत असतात. त्याचप्रमाणे मक्याचे दाणे काढून ते शिजवून वेगवेगळे पदार्थ बनवून अनेक तरुण तरुणी खात असल्याने या छोट्या व्यावसाईकांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसून येते.
उरण शहरात मकाविक्रेते मोक्याच्या ठिकाणी हातगाडी लावून विक्री करताना दिसत आहेत. पाऊस सुरू झाला की मक्याच्या गाडीवर नागरिकांची खूपच गर्दी असते. वरून पवसाच्या धारा, निखार्यावर भाजलेला मका, त्यावर तिखट मीठ व पिळलेले लिंबू असा मका खाण्याची मजा काही औरच असते. हे मके शहरात एन. आय. हायस्कूल समोर, विमला तलाव, गांधी चौक, उरण चार-फाटा, आनंद नगर, पेन्शन पार्क आदी ठिकाणी मका विक्रेते हातगाड्यांवर मका विकताना दिसत आहेत. बाजारपेठेत मका वाट्यावर मिळतात. 50 रुपयांत एका वाट्यात 3 किंवा 4 मके असतात. कच्चे कणीस 20 रुपयास एक असे विकले जाते, तर लहान आकाराचे कणीस 10 रुपयास एक अशा भावाने विकले जाते, असे मकाविक्रेते संतोष हरीलाल निषाद यांनी सांगितले.