इटलीतील युनिव्हर्सिटी स्पर्धेत बाजी
रोम : वृत्तसंस्था
भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. इटलीतील नेपल्स शहरात सुरू असलेल्या 30व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. द्युती 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करीत अव्वल ठरली.
यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी द्युती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती.
या स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेने 11.33 सेकंदांत 100 मीटर अंतर पूर्ण करीत रौप्यपदक प्राप्त केले; तर जर्मनीच्या क्वायाईने 11.39 सेकंद अशी वेळ देत कांस्यपदक मिळविले.
द्युती चंदच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. द्युतीने ट्विट करीत सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यानंतर नेटकर्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.