बर्मिंगहम : वृत्तसंस्था
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 11) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीची दुसरी लढत होणार आहे. हा सामना एजबस्टनच्या मैदानावर खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषकावर नाव कोरले; तर दोन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता आठव्यांदा ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सातही वेळेस त्यांनी आपला उपांत्य फेरीतील सामना जिंकला आहे.
दुसरीकडे क्रिकेटचे जनक अशी ओळख असलेल्या इंग्लंडला आतापर्यंत एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आले नाही. यापूर्वी पाच वेळेस उपांत्य फेरीत पोहोचून इंग्लंडचा संघ दोनदा पराभूत झालाय, तर तीन वेळेस (1979, 1987, 1992) अंतिम फेरीत पोहोचूनदेखील विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला आहे. हा डाग ते यंदा पुसून काढतात की ‘कांगारू’ सलग सातवा उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरीत धडक देतात याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.