पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक बनावे, असे आवाहन पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले. ते खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शनिवारी (दि. 13) आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले; तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले.
सोहळ्यास सिडकोचे अध्यक्ष व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, कुसुम पाटील, हेमलता म्हात्रे, कुसुम म्हात्रे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सदस्य संजय भगत, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या शितला गावंड आदी उपस्थित होते.
स्व. चांगू काना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या कौतुक सोहळ्यात पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य वसंत बर्हाटे व उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडंट कौन्सिल व स्टुडंट वेल्फेअर विभागाच्या चेअरमन डॉ. एम. ए. म्हात्रे यांनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. आर. व्ही. येवले व प्रा. डॉ. जी. एस. तन्वर यांनी सूत्रसंचालन केले.