Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव हा भूमिपुत्रांचा विजय -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

उरण : प्रतिनिधी
नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास राज्य सरकारने मंजुरी देणे हा भूमिपुत्रांचा विजय असून ही मागणी मी 2015मध्ये संसदेत केली होती, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी (दि. 16) व्यक्त केले. ते जासई येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमास लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, 1984च्या आंदोलनातील रणरागिणी भारती पवार, उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, उद्योजक जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जि. प. सदस्य कुंदा ठाकूर, कॉ. भूषण पाटील, जेएनपीए संचालक दिनेश पाटील, रवींद्र पाटील, जासईचे सरपंच संतोष घरत, पागोटेचे सरपंच कृणाल पाटील, कृष्णकुमार भारती, ‘दिबां’चे पुत्र व महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील आदी उपस्थित होते.
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यात प्रखर लढा उभारण्यात आला होता. या लढ्यात जासई येथे 16 जानेवारी 1984 रोजी नामदेव शंकर घरत (चिर्ले) आणि रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम) हे पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले, तर दुसर्‍या दिवशी नवघर फाट्यावर जमलेल्या शेतकर्‍यांवरही गोळीबार करण्यात आला. यात कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील यांना हौतात्म्य आले. या शौर्यशाली व गौरवशाली लढ्याचा स्मृतिदिन दरवर्षीप्रमाणे होत असतो.
यानिमित्त मान्यवरांनी चिर्ले व धुतूम येथे हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तर जासईत ‘दिबां’च्या पुतळ्यास अभिवादन करून स्मृती दिन कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गजानन म्हात्रे यांनी प्रकाशित केलेल्या ‘विमानतळ-एक संघर्ष’ या पुस्तकाचे आणि प्रकाश तांडे यांनी गायलेल्या ‘विसर न व्हावा ऐसा घडला आंदोलन तो उरणांचा’ या गाण्याच्या सीडीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई विमानतळ हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक विमान उडताना व उतरताना आपले नेते दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा होणार आहे. आपल्या भूमीवर ‘दिबां’च्या नावाची उद्घोषणा हा अभिमानाचा क्षण ठरणार असल्याचे या वेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले. इतर मान्यवरांनीही विचार मांडले. ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले.
एकत्र येऊन प्रश्न सोडवूया -लोकनेते रामशेठ ठाकूर
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, दि. बा. पाटीलसाहेबांनी भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्तांसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचा संघर्षमय आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण आपली जुनी ताकद जर जिवंत ठेवली तर आपल्याला मागण्या मान्य करण्यासाठी वारंवार विनंती करावी लागणार नाही. राजकारण हे फक्त निवडणकीपुरतेच करा आणि समाजकारण करतेवेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले. मग आपले राहिलेले प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply