खारघर : प्रतिनिधी
खारघर शहराला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सिडकोने या परिसराचा विकास केला आहे, मात्र विकासाच्या नावाखाली शहराच्या नैसर्गिक साधनसंपदेचे जतन होणे गरजेचे आहे. या हेतूने शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी खारघर हिल परिसरात बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. आय नेचर ऑच या संस्थेमार्फत दगडाचे बांध घालण्याचे काम सुरू आहे. खारघर हिल परिसरात अनेक ठिकाणी माती खचण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. यासंदर्भात उपाययोजना म्हणून शेकडोंच्या संख्येने रहिवासी व संस्थेचे पदाधिकारी एकत्र आले होते. खारघर हिल ड्रायव्हिंग रेंज परिसरातच लहान लहान दगडांचे बंधारे घालण्याचे काम शनिवारी सुरू करण्यात आले. हे काम असेच सुरू ठेवण्यात येणार आहे. हिल परिसरात ज्या ठिकाणी माती खचण्याचे प्रकार सर्वात जास्त घडतात अशा ठिकाणी दगडांचे बंधारे घालण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे संस्थेच्या मार्फत सांगण्यात आले आहे. शहरातील नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्यासाठी खारघरवासीयांनी देखील पुढाकार घेण्याची विनंती या वेळी करण्यात आली आहे. या आय नेचर ऑचच्या मोहिमेत सध्याच्या घडीला शहरातील नागरिक सहभाग घेत आहेत.