पनवेल ः प्रतिनिधी
सर्व समाजाचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी 9 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत
पनवेल शहरातील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटजवळील मोकळा भूखंड येथून होणार आहे. या वेळी भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
1 जून रोजी प्रभाग 19मधील पनवेल कोळीवाडा परिसर, मार्केट यार्ड, मच्छी मार्केट, कोळीवाडा पकटी, घोडके हॉस्पिटल परिसर, प्रभाग 18 बल्लाळेश्वर मंदिर परिसर, पायोनियर सोसायटी या परिसरात हे अभियान राबविले जाणार आहे. एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ओळखले जातात. सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गरीब-गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देण्याचे काम ते सतत करतात. गेल्या तीन दशकांत त्यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात रस्ते साफसफाई, गटार, पदपथ, मोकळे भूखंड, सार्वजनिक बागा आदी परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. याबरोबरच औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी, मनुष्यबळ, पावडर विकास मंडळाच्या वतीने पुरवण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत 20 प्रभागांचा समावेश आहे. या अभियानानंतरही स्वच्छतेवर भर देत संपूर्ण परिसर कायम स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. या महाअभियानात रोज विविध प्रभागांत स्वच्छता करण्यात येईल. यावर लक्ष देण्याची जबाबदारी मनपाचे आरोग्य निरीक्षक, नगरसेवक आणि भाजप पदाधिकार्यांवर सोपवण्यात आली आहे. या अभियानात विविध सेवाभावी संस्था तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे सचिव तथा महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.
– रविवार दिनांक 2 जून रोजी खारघर शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सोमवार दि. 3 जून रोजी प्रभाग क्रमांक 20मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ’चला रंगवूया पनवेल’
पनवेल ः प्रतिनिधी
दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त पनवेल भाजपच्या वतीने ’चला रंगवूया पनवेल’ शिर्षकाखाली दि. 4 ते 14 जूनपर्यंत ‘सुंदर माझी भिंत’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार, तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपयांचे आहे. स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धकांना सहभाग घेता येईल. स्पर्धकांनी नावे नोंदवून आपले कलाचित्र कागदावर रेखाटून आयोजकांची मंजुरी घेणे अनिवार्य आहे, तसेच स्पर्धकांना प्रति स्के.फू. 200 रु. प्रायोजकत्व मिळेल. स्पर्धक सामूहिक वा वैयक्तिक प्रकारात सहभाग नोंदवू शकतात. स्पर्धकांनी रंगवायच्या भिंती स्वतः शोधून संबंधित परवानग्या घेणे अनिवार्य आहे. भिंत रंगवण्याचे काम किमान 100 स्के. फूट असावे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी 9821531547 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.