पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर दुंदरे ग्रामपंचायतीने स्वतः पुढाकार घेत या रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.
वाकडी, चिंचवली, रिटघर, दुंदरे या गावांना जोडणारा वाकडी-दुंदरे हा तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता असून, मोठ्या संख्येने लोक या परिसरात वास्तव्यास आहेत. येथील रस्त्यावर खड्ड्यांची संख्या जास्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत असून, प्रवाशांना मणक्याचा आजार जडू लागला आहे. काही वर्षांपूर्वी चिंचवली-दुंदरे रस्ता बनविण्यात आला होता, मात्र या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता.
खड्डे बुजविण्याबाबत जिल्हा परिषद दिरंगाई करीत असल्याने दुंदरे ग्रामपंचायतीकडून खड्डे बुजविण्याची मोहीम सुरुवात करण्यात आली आहे. सिमेंट व खडीच्या सहाय्याने येथील खड्डे बुजविण्यात येत आहेत.
सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेतंर्गत दुंदरे ग्रामपंचायतीने रस्त्याचे खड्डे बुजवून आदर्श घालून दिला आहे. यात रिक्षाचालक संघटनेने सहकार्य केले. जे काम जिल्हा परिषदेला जमले नाही ते उपसरपंच रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले असून, भाजप नेते संजय पाटील, रेश्मा शेळके, भूपेंद्र पाटील, के. एन. घरत यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. या वेळी सरपंच अनुराधा वाघमारे, नरेश पाटील, किशोर पाटील, मीराबाई चौधरी, दर्शना चौधरी, मंगला उसाटकर, संगीता उसाटकर, भारत भोपी, दीपक उलवेकर, कलावंती पाटील आदी उपस्थित होते.