मंदिरामध्ये भरतात वर्ग; तहसीलदारांकडून पाहणी
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर व भिंत सुमारे दोन वर्षांपूर्वी कोसळली. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील काळभैरव मंदिरात शाळा भरविली जात आहे, मात्र आजतागायत शाळेच्या इमारत दुरुस्तीकडे रायगड जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, या पडिक शाळा इमारतीची व मंदिरात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी पाहणी केली.
आपटवणे येथे 1946 पासून प्राथमिक शाळा सुरू आहे. सध्या या शाळेत आपटवणे गावांसह सभोवतालच्या आदिवासी वाड्यापाड्यातील एकूण 112 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र या शाळेच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे 20 ऑगस्ट 2017 रोजी शाळेची इमारत कोसळली. तेव्हापासून आजतागायत इमारत दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध होण्यासाठी प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे, मात्र त्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आजमितीस या शाळेचे विद्यार्थी गावातील काळभैरव मंदिराच्या सभागृहात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र हे सभागृहदेखील गळके असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी नुकतीच आपटवणे गावाला भेट देऊन तेथील पडक्या प्राथमिक शाळेची, तसेच काळभैरव मंदिराच्या गळक्या सभागृहात बसून सर्व वर्गातील विद्यार्थी एकत्रितपणे शिक्षण घेत असल्याच्या परिस्थितीची पाहणी केली.
पटसंख्या घटत असल्याने सध्या मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत, मात्र आपटवणेसारख्या मराठी शाळा आजही तग धरून आहेत. या शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी सलग दोन वर्षांपासून गटविकास अधिकार्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका प्रमिला म्हात्रे यांनी सांगितले, मात्र आजतागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याची खंत शिक्षकांनी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याकडे व्यक्त केली. या वेळी गावातील जि. प.ची प्राथमिक शाळा सुसज्ज व सुरक्षित करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी केली.