Breaking News

रोह्यातील लाचखोर सहाय्यक गटविकास अधिकारी जाळ्यात

रोहे ः प्रतिनिधी

रोहा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित कौरू राठोड यांना 10 हजारांची लाच घेताना शुक्रवारी (दि. 25) कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड पथकाने ही कारवाई केली. यामुळे रोह्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्याविरोधात नवी मुंबईतील कोकण भवन येथे चौकशी सुरू होती. या चौकशीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड यांना सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमले होते. तक्रारदारच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी राठोड यांनी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची मागणी करून 28 फेब्रुवारी रोजी यातील पाच हजार रुपये स्वीकारले होते. राठोड यांनी उर्वरित 10 हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली असता तक्रारदाराने राठोड यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजीत गलांडे, हवालदार कौस्तुक मगर, नाईक विवेक खंडागळे, जितेंद्र पाटील, स्वप्नाली पाटील यांनी शुक्रवारी सापळा रचला. या वेळी तक्रारदाराकडून उर्वरित 10 हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित राठोड यांना पंचांच्या समक्ष कार्यालयात पकडण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply