Breaking News

युती झाली, ही तर कार्यकर्त्यांची इच्छा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी व्यक्त केली भावना

अलिबाग : प्रतिनिधी

भाजपशी युती व्हावी, ही तर तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. सेना, भाजप युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जागा वाटपात ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढू, ज्या जागा भाजपला जातील, तिथे त्यांना पूर्ण क्षमतेने मदत करू, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी शुक्रवारी (दि. 22) अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेऊन, सेना-भाजप युतीमुळे कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले. रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते हे सेना-भाजप युतीचे उमेदवार असून, येत्या 1 मार्चला अलिबाग येथे होणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिरात गिते यांच्या प्रचाराचा नारळ अधिकृतपणे फुटणार असल्याची माहिती जैन यांनी या वेळी दिली.

अलिबाग समुद्रकिनार्‍याजवळील मैदानावर होणार्‍या या मेळाव्यात जिल्ह्यामधील 12 तालुक्यांतील सामाजिक संघटनांना शिवसेनेच्या वतीने 12 अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे वितरण केले जाणार आहे. अनंत गीते यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, असे किशोर जैन यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून यापूर्वी जिल्ह्यात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले होते. जिल्ह्यात पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक टॅब देण्यात आले होते. तर माणगाव येथे एका अत्याधुनिक कार्डीयाक रुग्णवाहिकेचे वितरण करण्यात आले होते. याच धर्तीवर आता प्रत्येक तालुक्याला सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या रुग्णवाहिका कार्यरत राहतील, अशी माहिती किशोर जैन यांनी दिली. या वेळी शिवसेना नेते विजय कवळे, संतोष पाटील, दीपक रानवडे, संदीप पालकर, अ‍ॅड. सुशील पाटील उपस्थित होते.

शिवसेना-भाजप यांची युती नैसर्गिक आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी अनैसर्गिक आहे. युतीचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे. राष्ट्रवादीने शेकापबरोबर आघाडी केली तरी त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार नाही. पेण विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला तर आम्ही तेथे पूर्ण ताकदिने भाजपच्या उमेदवाराला मदत करू.

-किशोर जैन, जिल्हा प्रमुख, रायगड शिवसेना

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply