Breaking News

माथेरानच्या जलवाहिनीला गळती

नेरळच्या हुतात्मा चौकात पाण्याचा कालवा; जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार

नेरळजवळील उल्हास नदीमधील पाणी उचलून जलवाहिनीद्वारे माथेरान या पर्यटनस्थळी नेले जाते. ती जलवाहिनी गेल्या 15 दिवसांपासून फुटली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे नेरळच्या हुतात्मा चौकातून कालव्यासारखे पाणी वाहत आहे. त्यामुळे नेरळमधील हुतात्मा चौकातील बागेची मातीदेखील वाहून जात आहे. दरम्यान, ही पाणी गळती अशीच सुरू राहिल्यास माथेरानला कमी प्रमाणात पाणी पोहचले जाईल आणि नेरळ हुतात्मा चौकातील गार्डनची दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. माथेरानला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी उल्हास नदी येथून कुंभे गावातून कर्जत-कल्याण रस्त्याने नेरळच्या हुतात्मा चौक येथे येते. त्यानंतर ती जलवाहिनी नेरळ-माथेरान घाटरस्त्याच्या कडेने माथेरानला जाते. या जलवाहिनीला नेरळच्या हुतात्मा चौकात मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे तेथे दिवसभर पाण्याचा प्रवाह वाहत असून ते पाणी रस्त्याचे डांबरीकरण खराब करीत आहे.  त्याच वेळी रस्त्याच्यामधूनच पाण्याचा प्रवाह वाहत जात असल्याने रस्त्यावर हिरवी शेवाळ तयार झाली असून रस्तादेखील चिकट होऊ लागला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान गिरीस्थान नगर परिषद यांना या पाणीगळतीबद्दल माहिती देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता आणि कर्जत-कल्याण या दोन्ही रस्त्यावरून कालव्यासारखे पाणी सतत वाहत आहे. त्यामुळे नव्याने डांबरीकरण केलेल्या या दोन्ही रस्त्याची, तसेच नेरळच्या हुतात्मा चौकातील गार्डनची स्थिती नाजूक बनली आहे. या पाणीगळतीबाबत माथेरान नगर परिषदेला कळविण्यात आले आहे, मात्र त्यांच्याकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे  नेरळ ग्रामपंचायतने नाराजी व्यक्त केली आहे.

जलवाहिनीला लागलेली गळती आणि त्यापासून हुतात्मा चौक आणि स्मारकाचे होत असलेल्या नुकसानीबाबत हुतात्मा स्मारक समितीने माथेरान नगर परिषदला कळविले आहे. हुतात्मा चौक आणि स्मारक हे नेरळ गावाचे भूषण असून ते आमच्या सर्वांचे स्फूर्तिस्थान आहे. त्यांची माथेरान जलवाहिनीमुळे दुरवस्था होणार असेल, तर ते चुकीचे आहे. कल्पना देऊनदेखील कोणी लक्ष देणार नसेल, तर आम्ही शांत बसणार नाही.

-अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ

माथेरान नळपाणी योजनेतून नेरळच्या हुतात्मा चौकातील फॉरेस्ट चौकी येथे होत असलेल्या पाणीगळतीबद्दल कर्मचारी वर्गाला सूचित केले आहे. त्याच वेळी अन्य कुठेही जलवाहिनी फुटून गळती होत असेल, तर त्यावरदेखील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-किरण शानबाग, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply