Breaking News

नैनाची सहावी नगर योजना शासनाकडे ; 243 हेक्टर जमिनीच्या विकासाचा आराखडा सादर

नवी मुंबई ः सिडको वृत्त सेवा

सिडकोच्या नैना प्रकल्पासाठी सहावी नगर रचना परियोजना तयार करण्यासाठीचा इरादा जाहीर करण्यास सिडको संचालक मंडळाच्या 19 जुलै 2019 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या पूर्वी नैना प्रकल्पाकरिता सिडकोतर्फे पाच नगर रचना योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा भोवतालच्या प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास व्हार्वों याकरिता महाराष्ट्र शासनाने दि. 10.01.2013च्या अधिसूचनेद्वारे रायगड जिल्हयातील 256 तर ठाणे जिल्हयातील 14  गावांतील मिळून 560 चौ.कि.मी. हे नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना) म्हणून अधिसूचित करून  या क्षेत्राकरीता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. तद्नंतर  दि 17 फेब्रुवारी 2016 व 18 मार्च 2016 च्या शासकीय आदेशान्वये काही क्षेत्रासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्यामुळे नैना प्रकल्पाची व्याप्ती 224 गावांसह 474 चौ.की.मी क्षेत्राकरीता मर्यादित राहून सिडकोतर्फे हे क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.

पनवेल लगतच्या 36.83 चौ.कि.मी. (3683 हेक्टर) क्षेत्राचा जलद विकास करण्याची मागणी लक्षात घेत तेथे सिडकोद्वारे पुरविण्यात येत असलेल्या सदयस्थितीतील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची आवश्यकता ओळखून नैनाच्या 23 गावांची अंतरिम विकास योजना दि. 27.04.2017  रोजी शासनाने मंजूर केली आहे. आणि उर्वरित 201 गावांची विकास योजना शासनाकडे मंजुरीसाठी सादर केली गेली आहे.

23 गावाच्या मंजूर विकास आराखडयातील सोयी-सुविधांचा विकास जमीन एकत्रिकरणाच्या माध्यमातून नगर रचना परियोजनांद्वारे अधिक चांगल्या प्रकारे साधला जातो हे लक्षात घेऊन शासनाच्या सल्ल्यानुसार उत्स्फूर्त पुढाकार घेऊन नगर रचना परियोजना अवलंबण्याचा निर्णय सिडकोने घेतला. नैना प्रकल्प हा सहभागी प्रारुप तत्त्वावर आधारित आहे. यामध्ये जमिनींचे प्रत्यक्ष संपादन न करता जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. नैना प्रकल्पाअंतर्गत योजनांमध्ये सहभागी होणार्‍या लाभधारकांना मूळ भूखंडाच्या 40 टक्के भूखंड हा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार असून अंतिम भूखंडावर 2.5 चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय राहणार आहे. उर्वरित 60 टक्के जमीन ही योजनेतील पायाभूत सुविधा विकसित करण्याकरिता वापरली जाणार आहे. ही स्थिती सर्वांसाठी फायद्याची (विन-विन सिच्युएशन) ठरणार असून याद्वारे विकासाचा समतोल साधला जाणार आहे. सिडकोची भूमिका यामध्ये समन्वयकाची राहणार आहे.

सहाव्या नगर रचना परियोजने अंतर्गत रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील चिखले, मोहो, शिवकर आणि पाली खुर्द या गाव भागांतील मिळून साधारणत: 243 हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. सदर नगर रचना परियोजनेच्या क्षेत्रामध्ये अंतरिम विकास आराखड्यातील अंदाजे 37.7 टक्के आरक्षणांचा समावेश असून हे आरक्षणे प्रामुखाने शाळा, क्रीडांगणे, बगीचे, उद्यान, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजार इत्यादी सार्वजनिक प्रयोजानासाठींचे आहेत. शिवाय आरक्षणांमध्ये विकास केंद्रांचाही समावेश आहे. प्रस्तावित इंटरचेंजद्वारे सदर योजना मल्टी मोडल कॉरिडॉर व 60 मीटर स्पाइन रस्त्याला जोडली जाणार आहे.    या आधीच्या पाच परियोजनांसाठी इरादा जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या व दुसर्‍या परियोजनेस व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची मंजुरी मिळाली आहे. तिसरी नगर रचना परियोजना संचालक, नगर रचना विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे विचारविनिमयार्थ सादर करण्यात आली आहे. तर चौथी व पाचवी रियोजना सिडको संचालक मंडळातर्फे मंजूर करण्यात आल्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply