कर्जत : बातमीदार
भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेंमेंट बँकेचा उपक्रम कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वारेदी आणि मालेगावमध्ये सुरू करण्यात आला आहे. दहिवली ग्रामपंचायत कार्यालयातील पोस्ट पेमेंट बँकेमध्ये बचत आणि चालू खाती यांच्या माध्यमातून व्यवहार करता येणार असून, तेथील सर्व व्यवहार पेपरलेस असणार आहेत. भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभागामार्फत ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक-सक्षम ग्राम’ हा उपक्रम कर्जत तालुक्यातील मालेगाव तर्फे वरेडी येथे सुरू करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या शाखेचे कामकाज चालणार आहे. सरपंच चिंधू तरे यांच्या हस्ते या बँकेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे, उपसरपंच यशवंत भवारे, नवी मुंबई डाक विभागाचे उपअधीक्षक विलास कुंभार, पनवेल विभाग व्यवस्थापक सुशील अहिरे, दहिवली मालेगाव बँकेचे व्यवस्थापक प्रमोद सूर्यराव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून आतापर्यंत बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या जनसामान्यांना बँकिंग प्रवाहात सामावून घेण्याचा शासनाचा मानस आहे. पोस्ट ऑफीसचे जाळे गावागावात पोहचलेले असल्याने पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून बँकिंग सेवा दुर्गमातील दुर्गम भागात पोहचविण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 1 सप्टेंबर 2018 रोजी स्थापन करण्यात आली असून या बँकेत पेपरलेस खाते उघडण्याची सुविधा आहे. फक्त आधार क्रमांक, पॅनकार्ड/फॉर्म 60 आणि मोबाईलच्या साहाय्याने अवघ्या 10 मिनिटात पेपरलेस खाते उघडले जाते. अत्यंत माफक शुल्कात पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच बँकेची सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक उपलब्ध करून देत आहे. सदर बँकेचे खाते हे आधार संलग्न असल्याने शासनाकडून येणारे सर्व अनुदान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, सबसिडी या खात्यावर जमा करण्याची सोय आहे, तसेच मोबाईल बिल, वीज बिल, डिश बिल, विमा अशा सर्व प्रकारचा भरणा या खात्यामार्फत करणे शक्य होणार आहे.
ग्रामस्थांचा विश्वास आणि डाक विभागाचे सहकार्य यातून काही दिवसातच मालेगाव तर्फे वरेडी गाव हे ‘खझइइ-सक्षम ग्राम’ झाले आहे. ग्रामस्थांचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पेपरलेस बचत खाते, तसेच व्यापार्यांचे चालू खाते उघडून त्यांना डिजिटलरीत्या पेमेंट्स स्वीकारण्याकरिता सक्षम करण्यात आले आहे.
-विलास कुंभार, उपअधीक्षक, डाक विभाग नवी मुंबई