Breaking News

राज्यात कडक निर्बंध लागू

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. सरकारच्या नव्या नियमावलीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य सरकारने गर्दी कमी करण्याकरिता निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार राज्यात दिवसा जमावबंदी जाहीर करण्यात आली असून पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. दुसरीकडे रात्री संचारबंदी असून रात्री 11 ते पहाटे 5पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी आहे, तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी आहे. शाळा-महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून यात केवळ दहावी, बारावीच्या बोर्डाकडून घेण्यात येणार्‍या परीक्षा व इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असेल. पर्यटनस्थळे, जलतरण तलाव, मैदाने, उद्याने, प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. शॉपिंग मॉल आणि बाजार रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद असणार. इतर वेळी 50 टक्के क्षमतेसह परवानगी असणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. रेस्टॉरंट आणि भोजनालये रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद असणार. इतर वेळी केवळ 50 टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार. क्षमता आणि उपस्थितीची माहिती सार्वजनिकपणे लिहावी लागणार. केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश असणार. होम डिलिव्हरी पूर्ण वेळ आणि सर्व दिवस सुरू राहणार. नाट्यगृह-सिनेमागृहांमध्येही 50 टक्के क्षमतेने उपस्थितीचे बंधन आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्र सरकारच्या नियमांनुसार होणार असून राज्यांतर्गत सर्व प्रकारच्या प्रवासासाठी 72 तासांत केलेली आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असणार. जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ पूर्वनियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना विनाप्रेक्षक परवानगी आहे.

जीम, ब्युटी पार्लरला अटींसह परवानगी

राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजेच केशकर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. अखेर सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करीत सुधारित आदेश जारी केले आहेत. नव्या सुधारित आदेशानुसार सोमवार (दि. 10)पासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीमदेखील 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. व्यायाम करतानाही मास्क वापरणे आवश्यक असणार आहे, तसेच दोन्ही ठिकाणी कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गर्दी होत असेल तर दारूची दुकानेही बंद करावी लागतील. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल, तर त्याबाबतही टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल. एकाच वेळी गर्दी करू नये, तसेच सामाजिक अंतर पाळले जावे.

-राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply