Breaking News

जनसामान्य व कार्यकर्त्यांच्या मनातील मुकुटमणी

नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आता सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर हे भाग्य समस्त पनवेलकरांचे प्रतिनिधित्व करीत असून, भाजप पक्षश्रेष्ठींनी प्रशांत ठाकूर यांना रायगड जिल्ह्यात भाजपचा झंझावात अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपचा प्रथम महापौर बसविण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत विरोधी सर्वच राजकीय पक्षांना चारीमुंड्या चित करीत पनवेल महापालिकेत सत्ता काबीज करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे चोख काम त्यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महामंडळे वाटपात त्यांच्या कुशल कामगिरीच्या जोरावर अल्पावधीतच त्यांच्यावर सिडको अध्यक्षपदाची जबाबदार सोपविली.

इतकी पदे मिळूनही प्रशांत ठाकूर यांच्या चेहर्‍याचा रंग बदलला नाही की बोलण्यातील मिजास वाढली नाही. माणुसकीचे नाते जपणारे आणि आपल्या स्वतःच्या कमाईतून अनेक गरीब व गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे खरे दानशूर नेतृत्व असलेले लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे सुपुत्र असून, मागील कित्येक वर्षांपासून जनसेवेशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या वडिलांचा वसा आधीच त्यांनी हाती घेतला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वप्रथम राजकारण न करता जनतेसाठी मोठ्या प्रबळतेने गरिबांचे वाली होऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यासह अजूबाजूच्या परिसरासह राज्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांना कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतून नव्हे, आमदारकीही नाही, तर थेट सलग दोन वेळा रायगड जिल्ह्याचे खासदार होण्याचा बहुमान येथील जनतेने दिला आहे.

आजही त्यांच्या कामाची लोकप्रियता कायम आहे. लोकसेवक असलेल्या पित्याचा वसा हाती घेऊन पनवेल नगर परिषदेतून अतिशय प्रबळ असलेल्या विरोधकांना हरवित प्रथम नगरसेवकापासून नगराध्यक्ष आणि आमदारकीच्या निवडणुकीत मोठे आव्हान स्वीकारून प्रशांत ठाकूर हे जनतेचे खरे लोकप्रतिनिधी बनले. विरोधकांना कधी करता आले नाही अशी न भुतो न भविष्यति विकासकामे पनवेल शहरात करण्यात यशस्वी ठरले. आजही नव्याने पनवेल शहरात येणार्‍या प्रत्येकाला बदलते पनवेल पाहावयास मिळत आहे.

साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली आहे. भाजपचे नवनवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी जिल्ह्यात निर्माण केली असून, विविध ठिकाणचे नेतृत्व करणार्‍या बलाढ्य नेत्यांना त्यांनी भाजपकडे आणण्यासाठी यशस्विता दाखविली आहे. राज्यातील पक्षश्रेष्ठींनीही त्यांना नियमितपणे पाठबळ दिल्याने हक्काचे नेतृव म्हणून आज येथील जनता त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.जनसामान्यांच्या समस्या आणि विकासकामे यातच अधिक वेळ देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सिडकोचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मांडले आहेत. पनवेल, उरण व नवी मुंबई येथील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी प्रमुख भूमिका हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्के भूखंड हा मुद्दाही निकाली लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मोठ्या तत्परतेने करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 12 वर्षे आरोग्य महाशिबिर राबवून त्याचा सर्वाधिक फायदा गरीब, गरजू रुग्णांना कसा होईल, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जात आहे. या महाशिबिराचा प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या भेटीस आलेल्यांची आवर्जून विचारपूस करणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणे, योग्य मार्गदर्शन आणि मदत करणे ही आमदार प्रशांत ठाकूर यांची खासियत आहे. ते आपले सामाजिक व राजकीय जीवन कारणी लावत आहेत. असिमित कर्तृत्वाने असंख्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत मतदारसंघात सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. असे म्हणतात की, सध्याच्या तरुणांच्या समोर योग्य आदर्श नाही, मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कार्यकौशल्याने, तडफदार कर्तृत्वाने तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे. पनवेलमध्ये शेकडो कोटी रुपयांची विकासकामे करून त्यांनी पनवेलला विकासमय करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर खर्‍या अर्थाने पनवेलचे विकासमूर्ती आहेत.

आमदार प्रशांत ठाकूर जनकल्याणाच्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन सर्वांगीण विकासाचा देव पाहात आहेत. यामुळे असंख्य युवकांच्या गळ्यांतील ताईत बनले आहेत. समयसूचकता, चौफेर वाचन, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून संभाषणचातुर्य यामुळे त्यांनी आपले ध्येयधोरण व विचार उत्तमरीतीने प्रदर्शित करीत असल्याने समोरच्या व्यक्तीवर वा समूहावर त्यांचा प्रभाव पडून त्यांच्या वाक्चातुर्याला प्रचंड दाद मिळते. कार्य आणि त्यागही तसाच आहे. पनवेल नगर परिषदेचे अध्यक्ष असताना अडीच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पनवेल शहरातील नागरिकांसाठी केलेल्या जनताभिमुख सोई-सवलती व कार्यामुळे जनतेने त्यांना पारंपरिक प्रथा मोडून पनवेलचे आमदार म्हणून निवडून दिले.गेल्या पनवेलचा मागचा 50 वर्षांत राहिलेला विकासकामांचा बॅकलॉग त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या दोन टर्ममध्ये भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 5 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस. या दिवशी त्यांचा 45वा वाढदिवस. पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे. अशा या तरुण नेतृत्वाला येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्याचे काम करण्याची संधी लाभो हीच त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा…!

-जीवन केणी, उरण

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply