Breaking News

धडाडीचा नेता

तरुण, शांत, संयमी आणि निष्कलंक नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पनवेललाच; नव्हे तर रायगड जिल्ह्याला लाभलेले आहे, असेच म्हणावे लागेल. सामान्यातल्या सामान्य माणासाच्या मदतीला धावून जाणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना राज्याच्या विधिमंडळातील एक सहकारी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा संबंध आला. त्यांना असलेली जनतेच्या कामाची तळमळ पाहायला मिळाली. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत सुरू असलेली त्यांची धडपड पाहून पक्षनेतृत्वाला त्यांचे वेगळेपण लक्षात आले. त्यामुळे प्रशांत ठाकूर हे संघ कार्यकर्ते नसतानाही रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनेची जबाबदारी जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांना देण्यात आली. त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळलेली आपल्याला दिसते. रायगड जिल्ह्यात आजवर जाती-पातीच्या राजकारणावर जास्त भर दिला जात होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, आदर्श गाव योजना राबवल्या. त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होईल याकडे लक्ष दिले. त्याची परिणती लोकांचा भाजपकडील कौल वाढू लागला आहे. रायगड जिल्ह्यात नाममात्र असलेल्या भाजपला आज पनवेल महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगर परिषदेत आणि ग्रामपंचायतीत सत्ता मिळालेली आहे. यामध्ये त्यांचे संघटन कौशल्य दिसून येते.

अत्यंत शांत, संयमी आणि निष्कलंक असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आहे. पनवेल महापालिकेत भाजपला सत्ता मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला. त्यांची काम करण्याची पद्धत आणि स्वीकारलेली जबाबदारी पार पाडण्याचे कौशल्य यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सिडकोचे अध्यक्षपद त्यांना दिले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात येणार्‍या अडचणी दूर करून काम पूर्ण करतील असा विश्वास त्यांच्याबद्दल मख्यमंत्र्यांना आहे. सिडकोचे अध्यक्ष म्हणून काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे त्यांचे सुरू असलेले प्रयत्न आपल्याला दिसतच आहेत. यामुळे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील याची खात्री आहे.

लोकसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेली सुमारे 54 हजार मतांची आघाडी ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामाची पावतीच आहे. त्यांनी पनवेल महापालिका स्थापन झाल्यापासून मनपा हद्दीत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळवला. पनवेलमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अमृत योजना मंजूर करून घेतली. रस्ते, गटार यासाठी निधी मिळवला. त्याची सुरू असलेली कामे आपल्याला पाहायला मिळतात.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कामांचा वारसा घेऊन आमदार प्रशांत ठाकूर विविध क्षेत्रांत करीत असलेल्या कामाचा धडाका पाहून पनवेल तालुक्यातच नव्हे; तर जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ वाढला आहे. विरोधकांच्या मतांमध्ये झालेली घट आपल्याला पाहायला मिळते. आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचा विचार केला, तर तरुणवर्ग आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामागे आहे, पण या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात असणारा कॉस्मोपोलिटन मतदारही त्यांच्याच पाठीशी आहे. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय ही औपचारिकताच असेल. अशा या तरुण, शांत, संयमी आणि निष्कलंक नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा!

(शब्दांकन : नितीन देशमुख)

-ना. रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply