रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक 40 वर्षांपूर्वी रंगमंचावर आले होते. 40 वर्षांनंतर आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले आहे. चिन्मय मांडलेकर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. पूर्वी या नाटकात दिलीप प्रभावळकर चेटकिणीची भूमिका करीत असत. आता वैभव मांगले ही भूमिका करतात. पूर्वीची प्रभावळकर यांची चेटकीण खूप गंभीर होती, परंतु वैभव मांगले यांनी आताची चेटकीण विनोदी केली आहे. ती मुलांना हसवते आणि काही क्षणात भीती वाटायला लावते. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ या नाटकातील वरवंटे काका ही त्यांची पहिली भूमिका. आज 16 वर्षांनंतर ‘अलबत्या गलबत्या’तील चेटकीण हा मांगले यांचा प्रवास खूप कौतुकास्पद आहे.
आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका अभिनेता वैभव मांगले यांनी आजवर साकारल्या आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाट्यात त्याने साकारलेल्या चेटकिणीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातलं एक अतिशय आवडतं व्यक्तिमत्त्व म्हणून वैभव मांगले सर्वपरिचित आहेत. ‘फू बाई फू’, ‘टाइमपास 1 व 2’ यांच्याद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘संगीतातला साज दम असेल तर लावायचा’, असे म्हणत वैभव आता झी युवावरील ‘युवा सिंगर एक नंबर’ या संगीतमय कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. वैभवच्या ‘अलबत्या गलबत्या’तील चेटकिणीने तर बच्चे कंपनींसह सर्वांनाच वेड लावले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलेल्या वैभव यांच्या आयुष्यात संघर्ष आहे. कोकणातील देवरुख (जि. रत्नागिरी) या एका छोट्याशा गावातून येऊन त्याने या क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आणि नवोदित कलाकरांना प्रेरणा देणारा आहे.
कासारकोळवण हे वैभव यांचे गाव. त्यांचे वडील आणि आजोबाही अभिनय करीत. वडील महावितरणमध्ये नोकरीला असल्याने त्यांचे वास्तव्य देवरूखला होते. अभिनय क्षेत्रात नाव कमावलेला वैभव विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून त्याने विज्ञान शाखेतून पदवी घेतली आहे. रत्नागिरीत असताना त्याने स्टार थिएटर्समधून अभिनयाला सुरुवात केली. स्टार थिएटर्सचे अप्पा रणभिसे व अन्य सहकार्यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. कॉलेजमधूनही तो अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाला. पुढे मुंबईत तो आपल्या कोळपे काकांकडे आला.
बीएस्सी, बीएड्, डीएड् झाल्यावर ते काकांच्या आग्रहाने मुंबईला आले. तेथे 10-12 जणांबरोबर मित्राच्या खोलीत राहत असताना त्यांचा आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला. नाटकांमध्ये त्यांनी स्त्री भूमिकाही केल्या आहेत. ग्रामीण नाटकांमध्येही काम करणारे वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वर्हाडी या बोलीभाषा सफाईने बोलतात. मुंबईत आल्यावर दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ या नाटकात त्यांना ‘वरवंटे’ काकांची भूमिका करण्याची संधी मिळाली. हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. या संधीचे त्यांनी सोने केले व यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. 2004 साली आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी सचिन पिळगावकर यांनी दिली. पुढे परेश मोकाशी यांच्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटात संधी मिळाली.
झी मराठी वाहिनीवर मराठी नाटकांतील स्त्री भूमिकांची स्थित्यंतरे दाखवणारा ‘नांदी’ हा कार्यक्रम झाला होता. त्यात संगीत सौभद्राचा एक प्रवेश होता. त्या प्रवेशात रुक्मिणीच्या भूमिकेत वैभव मांगले होते. अजय पूरकर श्रीकृष्ण झाले होते.
‘एक डाव भुताचा’, ‘करून गेलो गाव’ (स्त्री-भूमिका), ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘लग्नकल्लोळ’ (या नाटकांत केलेल्या कामासाठी उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार), ‘वाडा चिरेबंदी’, ‘वासूची सासू’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘संगीत सौभद्र’ नाटकातला एक प्रवेश (रुक्मिणीची भूमिका) अशा नाटकांत त्यांनी अभिनय केला आहे.
‘कुंकू’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘फू बाई फू’ (या मालिकेत स्त्री भूमिकाही होती.) ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांतील वैभव यांच्या भूमिकाही गाजल्या.
‘आया सावन झूम के’, ‘उचला रे उचला’, ‘काकस्पर्श’, ‘कोकणस्थ-ताठ कणा हाच बाणा’, ‘चांदी’ ‘टाइमपास-1’ (दिग्दर्शक-रवी जाधव) (या चित्रपटातील जिंदगी जिंदगी या कोरस गाण्यात वैभव मांगले यांचाही आवाज आहे.), ‘टाइमपास-2’, ‘टूरिंग टॉकीज’, ‘दुनियादारी’, ‘पिपाणी’, ‘पोस्ट कार्ड’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘शाळा’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘सांगतो ऐका’, ‘साले लोअर मिडल क्लास’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ अशा चित्रपटांतून वैभव मांगले यांनी वेगवेगळ्या भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप पाडली. आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गायनाचे शिक्षणही वैभव मांगले यांनी घेतले. ते गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासारखा मिळताजुळता आवाज काढतात. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी जगभर पोहचविली, त्याप्रमाणे संगमेश्वरी बोलीला ओळख मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
-योगेश बांडागळे, पनवेल