Breaking News

लाडक्या गणरायाला भक्तांचा भावपूर्ण निरोप

10 दिवस चाललेल्या चैतन्य सोहळ्याची सांगता

अलिबाग : प्रतिनिधी

आपल्या लाडक्या गणरायाला 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. समुद्रकिनारे, नदी, तलाव अशा विसर्जन घाटांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. टाळ-मृदंगाचा नाद, घुमणार्‍या आरत्या, सुगंधाचा दरवळ आणि भारावलेले वातावरण अशा चैतन्य सोहळ्याची गुरुवारी सांगता झाली. या विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर होती. दरम्यान, जिल्ह्यातील 150 सार्वजनिक व 17 हजार 16 खाजगी असे एकूण 17 हजार 166 गणेशमूर्तीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अलिबागसह अन्य ठिकाणी निर्माल्य संकलन व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणा, विविध स्वयंसेवी संस्था विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज होते. पोलीस बंदोबस्तात कुठेही त्रुटी राहू नये, याची दक्षताही रायगड पोलीस अधीक्षकांनी घेतली होती. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांबरोबरच एसआरपीएफ, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स, होमगार्ड आदी सुरक्षा यंत्रणेमार्फत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गणरायाला निरोप देण्यासाठी तलाव, विहिरी, समुद्रकिनारी अशा विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी उसळली होती. वाहनांबरोबरच चालत गणेशमूर्ती घेऊन विसर्जनस्थळी जाणार्‍या भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पाऊस कोसळत होता तरीही भक्तांच्या आनंदात आणि उत्साहात कुठेही कमतरता दिसत नव्हती. कुठे ढोलताशांच्या तालावर वाजतगाजत गुलाल उधळत मिरवणुका निघाल्या, तर  कुठे टाळ-मृदंगाच्या साथीने पारंपरिक भजन गात भक्तगण पायी मिरवणुकीत सामील झाले होते. विसर्जन स्थळापर्यंत जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावून तयारी करण्यात आली होती. याशिवाय विसर्जन मिरवणुकींच्या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण 17 हजार 166 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. अलिबाग समुद्रकिनारी विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी अलिबाग नगरपालिकेतर्फे कर्मचार्‍यांचा ताफा तैनात होता. जीवरक्षक, मोटरबोटींची सोय, अग्निशमन यंत्रणा याबरोबरच रुग्णवाहिकाही सज्ज होत्या, तसेच त्या ठिकाणी पुरेशा प्रकाशाचीदेखील व्यवस्था केली होती. अलिबाग पोलिसांमार्फत समुद्रकिनारी मदत केंद्र उभारण्यात आले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, असे आवाहन करून आपल्या लाडक्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply