कडाव : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली येथील पेज नदीच्या पुलावर गेल्या दहा दिवसांपासून वीज वाहिन्या पडल्या असून, त्याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पाली हे गाव आणि तीन आदिवासी वाड्या पेज नदीकिनारी वसल्या आहेत. येथे मोठी नागरीवस्ती आहे. येथील पेज नदीच्या बाजूने महावितरणच्या वीज वाहिन्या टाकण्यात आल्या असून, दहा-बारा दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या पावसात विजेचे खांब पडल्याने त्यावरील वीजवाहिन्या पेज नदीच्या पुलावर आडव्या पडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्यांसह गुरांना या पुलावरुन जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुलावर पडलेल्या वीज वाहिन्या हटविण्याच्या कामाकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले असून, गणेशोत्सवापूर्वी हे काम महावितरण मार्गी लावेल का, असा सवालही ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.