मेलबर्न : वृत्तसंस्था
बॉक्सिंग डे कसोटीच्या विजयाचा शिल्पकार भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याचे सर्व जण कौतुक करीत आहेत. यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांची भर पडली आहे. रहाणेकडे उपजत नेतृत्वगुण आहेत. कौशल्य आणि धाडस या गुणांमुळे तो आपला ठसा उमटवतो, अशी प्रशंसा ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी केली आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फो संकेतस्थळासोबत बोलताना इयान चॅपेल म्हणाले, मेलबर्न क्रिकेट मैदानावर रहाणेने निर्दोष नेतृत्व केले. 2017मध्ये ज्यांनी धरमशाला येथे रहाणेला नेतृत्व करताना पहिले असेल, त्यांनी त्याच्यातील ही नेतृत्वकला त्याचवेळी ओळखली असेल.
माजी कर्णधार इयान चॅपेल पुढे म्हणाले, 2017मध्ये धरमशाला येथील सामन्यात त्याने घेतलेल्या निर्णयाने मी प्रभावित झालो होतो. शतकी खेळी करणार्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना रोखण्यासाठी रहाणेने पदार्पण करणार्या कुलदीप यादवला आक्रमणासाठी बोलवले. हे एक साहसी पाऊल होते. यादवने वार्नरची विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाने विजय मिळवला.
‘जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा तो शांतपणे त्याला सामोरा जातो. त्याने संघातील सहकार्यांकडून योग्य आदर मिळवला आहे, जो चांगल्या कर्णधारासाठी आवश्यक असतो,’ अशा शब्दांत चॅपेल यांनी रहाणेचे कौतुक केले आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …