पनवेल ः रामप्रहर वृत्त
जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामोठे सेक्टर 21 येथील महाकाली निवास सोसायटीमध्ये स्थलांतरित झालेल्या शाखेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) करण्यात आले. स्थानिक नागरिक, सभासद, ठेवीदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.
सहकार महर्षी सॉलिसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी कष्टकरी, शेतकरी आणि लघुउद्योजकांसाठी जीएस महानगर बँकेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या बँकेने छोट्या बचतींपासून मोठ्या उद्योगांपर्यंत पतपुरवठा करून अनेक कुटुंबांचा मार्ग मोकळा केला आहे.
बँकेच्या चेअरमन गीतांजली शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामोठे येथील स्थलांतरित शाखेच्या उद्घाटन समारंभाला नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक दिलीप पाटील व रवींद्र जोशी, सुनील गोवारी, बँकेचे व्हाईस चेअरमन भास्कर कवाद, शाखा व्यवस्थापक सावकार वाफारे, किरण झंजाड, तुकाराम कदम, रवी नवले, सचिन गोडसे, दत्तात्रय आंधळे, सुवर्णा वाळुंज, सुरेश ढवण, अमोल बोडखे, शिवाजी वाफारे, दौलत शिंदे, कृष्णा ढोमे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नवी मुंबईतील नगरसेवक रवींद्र इथापे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनीही महानगर बँकेच्या कामोठे शाखेला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन समारंभात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील जीएस महानगर बँकेचे योगदान अधोरेखित केले. ही बँक सर्वसामान्यांची आहे. ठेवीदारांचे पैसे पुन्हा त्यांच्याच विकासासाठी वापरले जातात. या बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योजक घडले असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे, असे ते म्हणाले. पनवेल परिसरात बँकेच्या अनेक शाखा कार्यरत असून सभासद आणि ठेवेदारांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. आर्थिक उलाढाल वाढत असल्यामुळे बँकेवरील लोकांचा विश्वास दृढ होत आहे. आगामी काळात शंभरहून अधिक शाखा सुरू करण्याचा संकल्प पूर्णत्वास जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच स्थानिक आमदार म्हणून बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बँकेच्या चेअरमन गीतांजली शेळके यांनी संचालक मंडळाने केलेल्या आधुनिकीकरणाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कामोठे शाखेत आगामी काळात 100 कोटींहून अधिक आर्थिक उलाढाल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, तर सहकार चळवळीच्या बळावर उभी असलेली ही संस्था आगामी काळात आर्थिक क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तशरीर आणि मन दोन्ही सुदृढ होण्यासाठी खेळाची नितांत गरज असून कुस्ती हा …
RamPrahar – The Panvel Daily Paper