Breaking News

जंगल सत्याग्रह करणारे चिरनेर

उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव श्री क्षेत्र महागणपती आणि 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे.

श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला, तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती साधारणपणे 2 मीटर उंच आणि 1 मीटर रुंद आहे. या गणपतीच्या पायात असलेले तोडे हे या गणपतीचे वैशिष्ट्य. महागणपतीची मूर्ती अंदाजे 300-400 वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जुनी असावी.

श्रींची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आलेली असून नंतरच्या काळात मूर्तिभंजकांपासून रक्षण करण्यासाठी मंदिरासमोर असलेल्या तलावात मूर्ती लपवून ठेवण्यात आली. कालांतराने पेशव्यांचे कल्याण येथील सुभेदार रामजी महादेव फडके चिरनेर येथे वास्तव्यास असताना त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला. दृष्टांतानुसार तलावातून गणपतीची चतुर्भुज मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि तलावाशेजारी या महागणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली, अशी आख्यायिका महागणपतीच्या मूर्तीबद्दल सांगण्यात येते.

1930 साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे चिरनेर गाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे या परिसरात प्राबल्य असून त्यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय होता. चिरनेर आणि परिसरातील कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावांतील गावकर्‍यांना जंगलातील लाकडे तोडण्यास 25 सप्टेंबर 1930 रोजी इंग्रजांनी विरोध केला, परंतु गावकर्‍यांनी काठ्या, कोयते, कुर्‍हाड, विळे इ. विविध अवजारे घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. ह्या सत्याग्रहासाठी परिसरातील अनेक लोक रस्त्यावर आले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी जीवाची तमा न बाळगता सत्याग्रह करून इंग्रजांचा रोष ओढवून घेतला.

सत्याग्रह चालू असताना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात आणि लाठीहल्ल्यामुळे अनेकांना अपंगत्व आले, तर धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), हे सत्याग्रही हुतात्मा झाले. या जंगल सत्याग्रहाला चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणून ओळखले जाते.

या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिरनेर गावात दोन हुतात्मा स्मारक बांधलेली आहेत. या स्मारकाच्या शेजारी हुतात्मा स्मारक शिल्प उभारण्यात आलेले असून या स्मारक शिल्पात हुतात्म्यांची शिल्प उभारण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर 1932 साली पाडलेल्या स्मृतिस्तंभाचा कळस ह्या स्मारक शिल्पात जतन करून ठेवला आहे. त्याचबरोबर सत्याग्रहाच्या वेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी महागणपती मंदिराच्या गजाला लागली. तो गज सत्याग्रहाची आठवण म्हणून मंदिरात अजूनही जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

महागणपती मंदिराच्या शेजारी शंकराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर आधुनिक दिसत असले तरी या ठिकाणी एखादे जुने मंदिर असावे असे तेथील विविध शिल्पावरून वाटते. सभामंडपातील असलेली नंदीची मूर्ती, गर्भगृहाच्या देवकोष्टकात असलेली गणपती आणि अजून एका देवतेची मूर्ती, गर्भगृहाच्या ललाटबिंबावरील गणेशमूर्ती, गाभार्‍यात असलेले शिवलिंग आणि मूळची भैरवाची, पण आता देवीची मूर्ती इ. अनेक शिल्प मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करतात. त्याचबरोबर मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करणारे महत्त्वाचे पुरावे म्हणजे मंदिर परिसरातील दोन गद्धेगाळ. गद्धेगाळावर शिलालेख कोरलेले असतात. वरील भागात सूर्यचंद्र आणि त्यांच्या मध्ये मंगलकलश, मधल्या भागात शिलालेख अर्थात राजाने दिलेले दानपत्र (लेख) आणि सर्वात खाली गाढव व स्त्री यांचा संकर असे गद्धेगाळाचे तीन भाग असतात. महाराष्ट्रात शिलाहार, चालुक्य, यादव इ. राजघराण्यांबरोबर मुसलमान शासकांनी कोरलेले गद्धेगाळ सापडतात. स्थानिक लोकांना गद्धेगाळांचे महत्त्व माहिती नसल्यामुळे आणि त्यावरील शिल्पामुळे गद्धेगाळांची निगा राखली जात नाही, तसेच अनेक शतके उघड्यावर राहिल्यामुळे किंवा दगड चांगल्या प्रतीचा नसल्यामुळे लेखाची झीज होऊन लेख अवाचनीय बनतो.

शंकर मंदिर परिसरात असलेल्या छोट्या मंदिरात एक गद्धेगाळ आहे, मात्र शेंदूर फासल्यामुळे शिलालेख नष्ट झाला आहे. मंदिरात स्थानिक देवतेची मूर्तीही आहे. दुसरी गद्धेगाळ मंदिराच्या शेजारी उघड्यावर आहे. या गद्धेगाळालासुद्धा शेंदूर लावल्यामुळे त्यावरील शिलालेख नष्ट झाला आहे. ह्या दोन्ही गद्धेगाळांच्या वैशिष्ट्यांवरून त्या शिलाहारकालातील म्हणजेच अंदाजे 1000-1200 वर्ष जुन्या असाव्यात.

श्रीक्षेत्र महागणपती मंदिराकडे जाताना एका घराच्या अंगणात घुमटी प्रकारातील दोन समाधी आहेत. एका घुमटीवर स्त्री-पुरुष तर दुसरीवर फक्त पुरुषाचे चित्र आहे. या दोन्ही घुमट्यांवर लेख नाहीत.

चिरनेर गावापासून साधारणपणे 5-6 किमी अंतरावर कर्नाळा किल्ला व अभयारण्य आहे. त्यामुळे चिरनेर गावाला भेट दिल्यानंतर कर्नाळा किल्ल्याला भेट द्यायला काहीच हरकत नाही.

-पंकज समेळ,  ‘महाराष्ट्र देशा’वरून साभार

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply