Breaking News

मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवणे चूक : देवेंद्र फडणवीस

मुंबई ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही, पण न्यायालयाने त्यांचा निर्णय दिला आहे. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. काही लोक राजकीय हेतूने कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहत आहेत, मात्र केंद्राकडं बोट दाखवणे ही पळवाट आहे. हा राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा याच्याशी संबंध नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. काही लोकांना असे वाटते की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी करा, मात्र मराठा समाजाला माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
 मराठा आरक्षणाबाबत मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधार्‍यांनीही संभ्रम करणारी वक्तव्य टाळावीत. आरक्षणासंदर्भात आपण सगळे निकष पूर्ण केलेत का? हे कोर्टाला सांगायचे आहे. सगळ्यांची एकत्र सुनावणी होताना आम्हाला स्थगिती का? हा मुद्दा आपण आता मांडायला हवा. इतर राज्यांप्रमाणे आपलाही कायदा टिकायला हवा, मात्र राज्य सरकार अंगावर काही घेत नाही. स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करावे लागतील. अध्यादेशाबाबत विधितज्ज्ञांसोबत चर्चा केली जाऊ शकते, असेही फडणवीस म्हणाले.
भरतीचा निर्णय अयोग्य
छत्रपती संभाजीराजे यांच्या भरतीसंदर्भातील वक्तव्यात वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सरकारने भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करावी. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा. भरती करावी मात्र आता घाई नाही. आपण ही स्थगिती हटवू शकतो का यावर विचार केला जावा. एक महिना उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय अयोग्य आहे, असे फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply