Breaking News

सामान्यांसाठी आरोग्य सुविधा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीतून व सततच्या पाठपुराव्यातून अशा रीतीने साकारलेले 100 खाटांचे पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला.

कुटुंबातील एखादी जरी व्यक्ती आजारी असेल आणि तिला सातत्यपूर्ण आरोग्यसेवेची गरज भासत असेल, तर अवघ्या घराच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अशात जर उपचारांसाठी वरचेवर पनवेलहून वाशी किंवा मुंबईला जावे लागले तर… मग त्या कुटुंबाच्या व विशेषत: आजारी व्यक्तीसोबत ये-जा करणार्‍या कुटुबीयाच्या हालांना पारावार राहत नाही. अशा सततच्या फेर्‍यांचा आर्थिक ताण येतोच, पण प्रवासाच्या जिकिरीमुळे बहुदा नाईलाजाने उपचार लांबणीवर टाकले जातात. मग अर्थातच त्यातून त्रासात भरच पडते. पनवेल व परिसरातील सर्वसामान्यांची ही अशी परवड ध्यानात घेऊनच सिडकोचे अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली काही वर्षे पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याचा ध्यास घेतला होता. पनवेल म्हणजे खरे तर मुंबई महानगर प्रदेशाचे जणूकाही प्रवेशद्वारच आहे. इतर अनेक बाबतीत वेगाने विकसित होत चाललेल्या पनवेलमध्ये दीर्घकाळ ग्रामीण रुग्णालय भाड्याच्या इमारतीत सुरू होते. 2009 मध्ये इथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी मंजुरी मिळाली. पनवेलची वाढती लोकसंख्या व परिसरातील अपघातांची संख्या पाहता येथे एक अद्ययावत रुग्णालयच असायला हवे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांना मनोमन वाटत होते. मग ही मागणी त्यांनी या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमातच तत्कालीन आरोग्यमंत्र्यांपर्यंत व पर्यायाने सरकारपर्यंत पोहोचवली. ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याची आणि सोबतच ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणी लगेचच मान्य झाली, परंतु मागणी मान्य झाली असली, तरी पुढे बराच पाठपुरावा करणे आवश्यक होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सातत्याने हा पाठपुरावा केला. चव्हाण यांनी मग ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत बैठका घेऊन कामाला चालना दिली गेली. आता या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक आदी 13 विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची, तसेच फिजिओथेरपिस्ट आदींचीही सेवा अल्पदरात उपलब्ध होणार आहे. याखेरीज 19 स्टाफ नर्स, 7 सिस्टर, 20 तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांची नेमणूकही करण्यात आली आहे. याखेरीज 57 कंत्राटी कर्मचारीही रुग्णालयात काम करतील. रुग्णालयातील प्रसूती आणि ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाले असून महिनाभराच्या काळात अस्थिसंबंधी आणि अन्य शस्त्रक्रियाही सुरू होतील. येथील डायलेसिस आणि सोनोग्राफीसारख्या सुविधांमुळेही लोकांची मोठी सोय होईल. रुग्णालयात आयसीयू सेंटर उपलब्ध असणे हा परिसरातील गोरगरीब जनतेसाठी मोठा दिलासा आहे. त्यामुळे अपघातानंतर वा तातडीच्या गंभीर उपचारांकरिता परिसरातील जनतेला आता वाशी अथवा मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही. रुग्णालयात क्षयरोग, तसेच एड्सवरील उपचार व समुपदेशनही उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्य जनतेला कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध व्हावेत यावर या रुग्णालयात भर देण्यात आला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply