Breaking News

आयपीओंनी केले गुंतवणूकदारांना मालामाल, दिग्गज कंपन्यांचे आयपीओ रांगेत!

भारतीय शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी कंपन्यांची रांग लागली असून त्यांच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. शेअर बाजार या गुंतवणूक प्रकाराकडे भारतीय गुंतवणूकदार गांभीर्याने पाहत असल्याचे हे लक्षण आहे.

सध्या शेअर मार्केटमध्ये तेजी, गुंतवणूकदारांचा सुकाळ, ट्रेडर्सची चांदी व ब्रोकर्सची चंगळ चालू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आपल्या बाजारात मागील महिन्यामध्ये 23000 कोटी आणि या महिन्यातदेखील सुमारे 6800 कोटी रुपयांची विक्री केल्यानंतरसुद्धा शेअरमार्केटचे

निर्देशांक सर्वोच्च पातळीवर पोहचले आहेत. याचं कारण म्हणजे स्वकीय गुंतवणूकदारांनी मागील महिन्यात 18000 कोटी आणि या महिन्यात आत्तापर्यंत 6400 कोटी रुपयांची केलेली खरेदी. यामध्ये मिडकॅप व स्मालकॅप कंपन्यांच्या शेअर्सनी नवनवे उच्चांक गेल्या काही महिन्यांत नोंदवले आहेत व आता त्यामध्ये प्राईस करेक्शन सुरू आहे. वर सुरुवातीस म्हटल्याप्रमाणं, या वर्षात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत परिस्थिती गंभीर असूनसुद्धा या वर्षात सेन्सेक्स, 47751 वरून आज 56100 म्हणजे जवळपास 17 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात वाढलेला आहे.

कोरोनाच्या लाटांची काळजी न करता जे गुंतवणूकदार मार्केटमध्ये गुंतून राहिले (डींरूशव खर्पींशीींशव), त्यांना बाजारानं उत्तम परतावा दिलेला आहेच, परंतु याच बाजारानं अजून एका प्रकारेदेखील जादाचा परतावा मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दिलेला आहे. तो म्हणजे आयपीओ.

मध्यम व कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी व विशेषतः सेल्फ-एम्प्लॉयीड लोकांसाठी घरकर्ज उपलब्ध करून देणारी प्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स, रसायन उद्योगांमधील केम्प्लास्ट सनमार, निरमा समूहाचा भाग असणारी न्यूवोको विस्टा ही सिमेंट व रेडीमिक्स बनवणारी कंपनी, ऑनलाइन गाड्यांची खरेदी-विक्री करणारी कंपनी कारट्रेड टेक, व्हिट्रीफाईड टाईल्स बनवणारी एक्झारो टाईल्स, उपनगरांत व ग्रामीण भागात आपलं जाळं असलेली क्र्सना डायग्नॉस्टीक्स, मोठ्या फार्मा कंपन्यांच्या मागणीनुसार उत्पादनं पुरवणारी विंडलाज बायोटेक, भारतातील केएफसी, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी, वानगो यांचे एकूण 655 स्टोर्स चालवणारी फ्रँचायझी देवयानी इंटरनॅशनल, गुजरातची मशीनचे सुटे भाग, विशेषतः रिंग्स बनवणारी रोलेक्स रिंग्स, जागतिक दर्जाचे 120 प्रकारचे अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल्स इन्ग्रिडंट्स बनवून 540 औषधी कंपन्यांना पुरवठा करणारी एक अग्रेसर कंपनी-ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस, स्पेशॅलिटी केमिकल्स मधील वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ असलेली तत्वचिंतन, सर्वांच्याच परिचयाची झोमॅटो ही फूड डिलिव्हरी करणारी कंपनी, स्पेशॅलिटी व फाईन केमिकल उत्पादन करणारी क्लीन सायन्स, पायाभूत क्षेत्रातील सरकारी कंत्राटं घेणारी जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट्स, अ‍ॅग्रो केमिकल क्षेत्रातील उत्पादक इंडियन पेस्टीसाईड्स. अशा विविध क्षेत्रातील एक ना अनेक कंपन्यांनी आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) वा ओएफएस (ऑफर फॉर सेल) द्वारे शेअर बाजारातून पैसा उभा केलेला दिसून येतो.

अनेक गुंतवणूकदारांनी या माध्यमांतूनदेखील आपले खिसे भरलेले आढळून येतात. प्रत्येक कंपन्यांच्या आयपीओस कमीतकमी दुप्पट तर जास्तीत जास्त शंभर पटींपेक्षा अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांनी दिलेला दिसून येतो. इतका प्रतिसाद मिळण्याची प्रमुख कारणं म्हणजे-

सर्व कंपन्यांचे आयपीओ हे बुक बिल्डिंग स्वरूपातील असल्यानं किंमत शोधन जास्त अचूक प्रकारे होऊ शकतं (कट-ऑफ प्राईस).

ऑनलाइन सुटसुटीत पेपरलेस टेक्नॉलॉजीमुळे नवनवीन गुंतवणूकदारांची विशेषतः तरुणांची रोज नव्यानं भर पडत असून हे गुंतवणूकदार प्रत्येक बाबतीत जागरूक आहेत.

आजच्या घटकेस अडइअ प्रकाराने बँक खात्यातून पैसे वळते होत असल्यानं अर्ज केलेले शेअर्स लागले तरच अर्जाची रक्कम खात्यातून वजा होते व लगेच शेअर्स खात्यात जमा होऊन एक-दोन दिवसांत ते शेअर्स विकून (शेअर नोंदणीच्या दिवशी) केवळ दोन ते चार दिवसांत पैसे मोकळे करता येत असल्यानं प्रत्येक सामान्य गुंतवणूकदार आयपीओस अर्ज करताना आढळतो.

सध्या बाजार तेजीच्या लाटेवर स्वार असल्यामुळं आयपीओच्या शेअर्सच्या नोंदणीच्या दिवशीची किंमत बहुतांशपणे आयपीओ विक्री किंमतीच्या वरच (सरासरी 40 टक्के)  राहिल्यानं मागणी जास्त.

अगदी आठवड्याभरात कमीतकमी चार ते पाच टक्के ते जास्तीत जास्त 100 टक्के पेक्षा अधिकपरताव्याची उदाहरणं व त्यामुळं तशीच शक्यता प्रत्येक वेळेस गृहीत धरून आयपीओमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम.

तर त्याआधी याच वर्षी 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणार्‍या कंपन्यांमध्ये क्रिष्णा इन्स्टिट्युट (56.12 टक्के), सोना प्रिसिजन (62.1 टक्के), मॅक्रोटेक डेव्हलपर्स (78.26 टक्के), बार्बेक्यू नेशन (117.38 टक्के), नजारा टेक्नॉलॉजिज (53.2 टक्के), लक्ष्मी ऑरगॅनिक (194.12 टक्के), ईझी ट्रिप प्लॅनर्स (133.24 टक्के), एमटीएआर टेक्नॉलिजीज (120.25%), न्यूरेका लि.(295.46 टक्के), स्टोव्ह क्राफ्ट (113.12 टक्के), इंडिगो पेंट्स (69.4 टक्के) या कंपन्या आहेत, मात्र काही कंपन्यांचे लिस्टिंगहे,  आयपीओच्या भावापेक्षा कमी भावात झाल्यानं झटपट नफा कमावू इच्छिणार्‍यांना फटकादेखील बसला आहे. आता येणार्‍या दिवसांत पेटीएम, मोबिक्विक, पॉलिसी बाजार, एलआयसी, नायका, आदित्य बिर्ला एएमसी, अर्बन कंपनी, एचडीबी अशा सुपरिचित कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. तर त्यासाठी आपापली जोखीम तपासून तयार राहणं फायद्याचं ठरू शकेल. यापैकी पेटीएम, मोबिक्विक, एचडीबी अशा कंपन्यांचे शेअर्स डिमॅट स्वरूपात उपलब्ध (प्री-आयपीओ)देखील आहेत. पाहुयात यापैकी कोणती कंपनी गुंतवणूकदारांना हात देतेय ते!

सुपरशेअर – बजाज फिनसर्व्ह

या आठवड्यात 12 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवणारी कंपनी बजाज फिनसर्व्ह ही या आठवड्याची सुपरशेअर ठरली. या कंपनीच्या शेअर्सनी मागील सहा महिन्यांपासून नवनवे उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. फेब्रुवारी 2021मध्ये 9000 रुपये किमतीच्या आत असणार्‍या या कंपनीच्या शेअर्सनी 16799 रुपये हा उच्चांक याच आठवड्यात नोंदवला आहे. भारतीय शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीनं कंपनीस अ‍ॅसेट मॅनेजमेंटसाठी तत्वतः होकार दिल्यामुळं कंपनीच्या शेअर्सना जोरदार मागणी होती. आता कंपनी ट्रस्टी व अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून म्युच्युअल फंड योजनांच्या खरेदी विक्रीचे काम पाहू शकेल आणि याचा फायदा कंपनीस मिळेल.

-प्रसाद भावे

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply