पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली असून आरोग्य सेवासुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे सातत्याने दिसून येते. अशातच मंगळवारी (दि. 10) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान एक गर्भवती महिला उपचाराकरिता आरोग्य केंद्रात आली असता रुग्णालयात कुणीही आढळून न आल्याने रुग्ण व नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह उठल्यावर त्या दिवशी ड्युटी असून गैरहजर असलेल्या कर्मचार्यांवर सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी तसेच पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारत त्या कर्मचार्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या कर्मचार्यांमध्ये स्टाफ नर्स रश्मी तावडे, आरोग्यसेविका संध्या नागोठकर, सफाई कामगार घनश्याम खोडागळे आदी कर्मचार्यांचा समावेश आहे. या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.