पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाटकमधील निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या साऊथ झोन सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धा 2019-20मध्ये पनवेल महापालिका हद्दीतील चार खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके पटकाविली.
14 वर्षांखालील मुलींच्या 51 किलोखालील गटात डीएव्ही पब्लिक स्कूलच्या अनन्या चितळे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर 17 वर्षांआतील 52 किलोखालील गटात न्यू होरीझन पब्लिक स्कूलच्या मधुरा दरेकर हिनेसुद्धा सुवर्णपदकाची कमाई केली.
17 वर्षांआतील मुलांच्या 73 किलोखालील गटात न्यू होरीझन पब्लिक स्कूलच्या वेदांत दरेकर याने रौप्य, तर शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या स्मिथ पाटील याने 51 किलोखालील गटात कांस्यपदक पटकाविले.
या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना तायक्वॉन्डो प्रशिक्षक प्रभाकर भोईर, सदानंद निंबरे, प्राजक्ता अंकोलेकर, संतोष पालेकर व मुग्धा भोसले यांनी मार्गदर्शन केले होते. अनन्या चितळे, मधुरा दरेकर, वेदांत दरेकर या खेळाडूंची राष्ट्रीय सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजयी खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील, रायगड तायक्वॉन्डो असोसिएशनचे पदाधिकारी, शाळेतील प्राचार्य व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.