कर्जत ः बातमीदार
माथेरान शहर आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न घेऊन माथेरानमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री, तसेच केंद्रीय भूपृष्ठमंत्री यांची भेट घेऊन माथेरानमधील रोजगाराचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली. भाजप नेते व जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक राजधानीत गेले होते. माथेरान हे ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी असलेले पर्यटनस्थळ आहे. येथील पर्यावरण राखले जावे यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 2002मध्ये माथेरान इको झोनची घोषणा केली होती. त्यानंतर माथेरानवर निर्बंध येऊन येथील रोजगार हिरावले. या संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा करण्यासाठी आणि त्यातून मार्ग निघावा यासाठी भाजपचे शिष्टमंडळ दिल्ली दरबारी गेले होते. या शिष्टमंडळात आमदार महेश बालदी, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह भाजपचे माथेरान अध्यक्ष प्रवीण सकपाळ, तसेच किरण चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, राजेश चौधरी, युवा नेते किरण ठाकरे यांचा समावेश होता. माथेरानमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हस्तक्षेप करून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक हातरिक्षा संघटना अनेक वर्षे करीत असून सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे, तर माथेरानला जाण्यासाठी सध्या एकमेव रस्ता असून केंद्रीय वन मंत्रालयाने पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. माथेरान इको झोन लागू करताना विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे, पण त्यातील त्रुटींबद्दल हरकती घेऊनदेखील कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना अवगत करण्यात आले. त्याचप्रमाणे सन 1959मध्ये सरकारने ब्रिटिश सरकारचे नियम कायम ठेवले आहेत. त्या कायद्यात बदल करण्याची प्रमुख मागणी शिष्टमंडळाने केली. याशिवाय माथेरानच्या जंगलात व्हॅली क्रॉसिंगच्या साहसी खेळास पर्यावरण मंत्रालयाने परवानगी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन केली. यानंतर भाजप शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. माथेरानला येणारे पर्यायी रस्ते बनविण्याची गरज असून दोन रस्ते केंद्राने ठरविल्यास होऊ शकतात, अशी चर्चा झाली. त्यात ब्रिटिशांनी माथेरानला येण्यासाठी वापरलेला रस्ता आणि पनवेलमधील धोदाणी येथून येणारा रस्ता केंद्राने पुढाकार घेऊन बनवावा, अशीही मागणी मंत्री गडकरी यांच्यापुढे करण्यात आली.