कर्जत : बातमीदार
तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य तसेच महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू आहे. या केंद्रास कर्जतच्या प्रांत अधिकारी वैशाली परदेशी आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अहिर राव यांनी भेट देऊन कुपोषित बालकांची विचारपूस केली.
रायगड जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या निधीमधून कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी बालउपचार केंद्र सुरू करण्यात आले असून, तेथे 13 बालके उपचार घेत आहेत. त्या सर्व बालकांवर बालरोग तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. 21 दिवस उपचार झाल्यानंतर त्या सर्व बालकांना घरी सोडले जाणार आहे. त्या बालकांसह तेथे राहणार्या त्यांच्या पालकांची भोजनाची आणि राहण्याची सोय शासनाकडून केली जात आहे. या बाल उपचार केंद्रास आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प आधिकारी आहिरराव तसेच उपविभागीय महसूल आधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी भेट दिली.
प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता, पोषण आहार तसेच तो आहार पुरविणार्या कर्मचार्यांना सूचना केल्या. उपचार घेत असलेल्या कुपोषित बालकांच्या वजनवाढीची आणि अन्य माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी दिली. या बालउपचार केंद्रासाठी आवश्यक तो निधी आदिवासी विकास विभाग देईल, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी आहिरराव यांनी दिले. या बालउपचार केंद्राचा उद्देश, भूमिका आणि आतापर्यंत झालेल्या घडामोडींबाबतची माहिती दिशा केंद्राचे कार्यकर्ते आणि पोषण हक्क प्रकल्पाचे समन्वयक अशोक जंगले यांनी या वेळी शासनाच्या अधिकार्यांना दिली.