खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका अंतर्गत येथे झालेल्या 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)च्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत झाली. या स्पर्धेत ‘आरटीपीएस’च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. यात 17 वर्षाखालील मुलांच्या 67 किलो वजनी गटात गोविंद तिवारी, 73 किलो गटात वैष्णव धोत्रे, 81 किलो गटात केतन पाटील, 96 किलो गटात रोहित कुमार या सर्वांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 17 वर्षाखालील मुलींमध्ये 59 किलो गटात फेलिना जबीन, 64 किलो गटात स्नेहा तोडेकर, 71 किलो गटात इप्सिता चव्हाण व 76 किलो गटात भाग्यश्री सुरसे या सर्वांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. 19 वर्षाखालील मुलांमध्ये 67 किलो गटात कल्पेश खडकर याने प्रथम, सिद्धेश खडकरने द्वितीय व शुभम घोलपने तृतीय क्रमांक मिळविला. 19 वर्षाखालील मुलांच्या दुसर्या गटात 73 किलो गटात झील चौव्हाण व 81 किलो गटात मोहम्मद लाकडिया या दोन स्पर्धकांनी पहिल्या क्रमांकाला गवसणी घातली, तर 19 वर्षाखालील मुलींमध्ये 59 किलो गटात वांशिक पाटील व 71 किलो गटात शाम खान यांनी बाजी मारली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या सरस्वती कोरडे यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.