पुणे : प्रतिनिधी
राज्यात महायुतीला 250 जागा मिळतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी कोथरूड मतदारसंघातून एक लाख 60 हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी होणार, असा दावाही केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोथरूडमध्ये येऊन बालशिक्षण मंदिरात मतदान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यात महायुतीला विक्रमी जागा मिळतील. काँग्रेसला 1972 साली मिळालेल्या विक्रमी जागांपेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदान करणार्यांना सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा
जास्त अधिकार -मुख्यमंत्री
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. लोकशाहीत मतदानाचे वेगळे महत्त्व आहे. निवडून येणार्या सरकारकडून लोकांना आशा, आकांक्षा, अपेक्षा असतात. या सर्व अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच आपल्या सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. मतदान करणार्यांना तो अधिक आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपुरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.