नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी 100 दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशा पद्धतीने त्यांची नियुक्ती करा, असे शहा यांनी सांगितले आहे.
पोलीस टू डिव्हिजनची कामे काय असतात यासंदर्भात झालेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रेझेंटेशनदरम्यान अमित शहा यांनी या सूचना केल्या. या प्रेझेंटेशनमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची नेमणूक दीर्घकाळासाठी घरापासून दूरवर केल्यास त्यांना काय त्रास होतो यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. त्यावर शहा यांनी एक सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा सल्ला दिला. या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त जवानांच्या सर्व माहितीचा आढावा घेतला जाईल. या माहितीआधारे त्यांची नियुक्ती अशा पद्धतीने केली जाईल की त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर वर्षातील कमीत कमी 100 दिवस तरी एकत्र राहता येईल.
-जवानांना प्रेरणा मिळेल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सूचना अमलात आणल्यास जवानांना त्यांच्या कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवता येईल. यामुळे जवानांना खूप फायदा होणार असून, त्यांना अनेक कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहता येणार आहे, तसेच या निर्णयामुळे जवानांना प्रेरणा मिळेल आणि सरकार आपल्याबद्दल विचार करतेय, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल, असे मत एका अधिकार्याने व्यक्त केले आहे.