Breaking News

घासून पुसून आली, पण महायुतीच!

महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेसाठी सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक घेतली. हरयाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील अनुक्रमे 90 आणि 288 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. तशाच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले निवडून आले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातसुद्धा याच दिवशी पोटनिवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019 रोजी पार पडली. सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी शांत झाली. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, शिक्षक, प्राध्यापक यांनी डोळ्यात तेल घालून काम केले. 2014ची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळची परिस्थिती वेगळी होती आणि 2019च्या यंदाच्या निवडणुकीतली परिस्थिती वेगळी होती. 2014 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची सुमारे 25-30 वर्षे जुनी युती काही कारणांमुळे तुटली आणि लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडीही तोडण्यात येऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्र लढले.

15 वर्षे सत्ता उपभोगणारी आघाडी जनतेने सत्तेवरून खाली खेचत भारतीय जनता पक्षाला 123 जागा मिळवून देत 288च्या विधानसभेत सर्वाधिक आमदारांचा पक्ष म्हणून पहिल्या क्रमांकावर नेऊन भाजपला विराजमान केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकहाती 63 जागा निवडून आणत दुसरा क्रमांक पटकावला, तर 15 वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदरात अनुक्रमे 42 आणि 41 जागा पडल्या. या 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती जशी झाली तशी दोन्ही काँग्रेसला आघाडी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती एकजिनसीपणाने या निवडणुकीच्या मैदानात उतरली होती (कणकवलीचा अपवाद वगळता). काँग्रेस पक्ष 2014 पासून तसं पाहता अजूनही चाचपडतोय. ‘जाणता राजा’ शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी ऐंशीच्या वयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात दोन्ही काँग्रेसचे जणू अघोषित नेतृत्व करीत महायुतीसमोर आव्हान उभे केले. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष  जगतप्रकाश नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, वसुंधराराजे (सिंधिया) शिंदे आदींबरोबरच उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे, रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत आदी महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आणि संपूर्ण महाराष्ट्रात भगवा झंझावात निर्माण केला. समाज माध्यमांतून जो काही धुरळा उडविण्यात आला, तो तर कमालीचा होता. अर्थात, निवडणुकीचे निकाल लागले ते सर्वच राजकीय पक्षांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे ठरले. आता दिवाळीनंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. तोपर्यंत कल्पनेचे पतंग उडवायला माध्यमांना भरपूर वाव आहे. निकालाच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी हळूच एक पुडी सोडून देताना ‘शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊ शकतात, जंग और प्यारमें सबकुछ जायज हैं।’ असे म्हटले मात्र माध्यमातून जोरदार चर्चांना उधाण आले.

येवल्यातून ओबीसींचे मसिहा छगन भुजबळ यांनीही राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सांगून शिवसेनेबद्दल आपल्या मनात अद्यापही मायेचा ओलावा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेबद्दल सकारात्मक भूमिका घेत महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपापसातील समन्वय कायम असल्याचे दाखवून देत सरकार महायुतीचेच येणार हे ठासून सांगितले. एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी हळूच पिल्लू सोडत असतानाच शरद पवार यांनी आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्यासाठी कौल दिला आहे आणि आम्ही मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेतून काम करू, असे निक्षून सांगितले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे सरकार आणि त्यांना काँग्रेस पक्षाचा बाहेरून पाठिंबा हा मुद्दाच निकालात निघाला आहे. केवळ प्रश्न आहे तो सरकार स्थापन करण्याचा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमवेत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील, याबद्दल निश्चितच खात्री आहे. आता फक्त महायुतीच्या नेत्यांनी शांत डोक्याने चर्चा करून निर्णय घ्यावा आणि बोलघेवड्यांना सुरक्षित अंतरावर ठेवूनच महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला सुखी, समृद्धी, आनंदी, विनासायास जीवन जगता येईल याचा साकल्याने विचार करून सरकार चालवावे.

भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्राला शिवसेनेच्या वचननाम्याची सांगड घालून महायुतीचा किमान समान कार्यक्रम बनवावा, महायुतीच्या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करावी, पक्षीय पातळीवर, तसेच सरकारच्या स्तरावर ही समन्वय समिती गठीत करावी. पक्षांच्या संख्येच्या आधारावर महामंडळाच्या नेमणुका तातडीने कराव्यात.

एक उदाहरण द्यायचे झाले, तर पनवेलचे कार्यसम्राट आमदार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, शिवसेनेचे विनोद घोसाळकर, उदय सामंत, विजय नाहटा आदींच्या नेमणुका मागील सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर करण्यात आल्या. यात सिडको आणि म्हाडातर्फे गेल्या वर्षभरात जी कामे झपाट्याने झाली तीच कामे चार वर्षांपूर्वीच झाली असती, तर विकासाचा वेग अधिक झपाट्याने वाढलेला दिसला असता. विलासराव देशमुख यांच्या काळापासून रखडलेल्या गोरेगावच्या मोतीलाल नगरचा हजारो कोटींचा प्रकल्प आणि सुमारे सतरा हजार लोकांच्या घरांचा प्रश्न मधू चव्हाण यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याबरोबर चुटकीसरशी मार्गी लावला, अशी अनेक कामे जर फडणवीस सरकारच्या पहिल्या राजवटीतील अखेरच्या वर्षभरात मार्गी लागू शकतात, तर आता सरकार स्थापन होताच कामांचे प्राधान्यक्रम ठरवून तातडीने नव्या नेमणुका करण्यात आल्या तर कुणाला बोट दाखवायला जागा राहणार नाही.

असो, कुणी काहीही म्हटले तरी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पार्टी, रयत क्रांती संघटना यांची महायुतीच घासून पुसून निवडून आली.

आता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्राने काम करून विकासाचा महामार्ग चोखाळावा. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे या तरुण नेतृत्वाने हातात हात घालून शिवशाही-3 हे सरकार संपूर्ण पाच वर्षे निष्कंटकपणे चालवावे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा; शेतकरी, कामगार, महिला, दीनदुबळे, शोषित, पीडित, समाजातील सर्वच घटकांना अच्छे दिन आणावेत. दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था होणार नाही, याची दक्षता घ्या. मनःपूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!!

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply