Breaking News

नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक

नवीन पनवेल भागातील तरुणीची फसवणूक नपुंसक असल्याचे लपवल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर
मुंबईच्या परळ भागात राहणार्‍या एका व्यक्तीने नपुंसक असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका 27 वर्षीय तरुणीसोबत विवाह करून तिची आणि तिच्या कटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी नपुंसक पतीसह त्याच्या नातेवाईकांविरोधात फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील तक्रारदार तरुणी नवीन पनवेल भागात आई वडील आणि भावासह राहण्यास आहे. तर तिच्यासोबत लग्न करणारा तिचा नपुंसक पती मुंबईच्या परळ भागात राहण्यास आहे. या तरुणीने 2018 मध्ये लग्नासाठी परेल येथील लग्न जुळविणार्‍या समाज मंडळाच्या साईटवर आपली नोंदणी केली होती. त्यावेळी नपुंसक व्यक्तीने या तरुणीला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये नपुंसक व्यक्ती एकटाच तरुणीला पाहण्यासाठी पनवेल येथील तिच्या घरी गेला होता. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर नपुंसक व्यक्तीचा भाऊ, वहिनी, चुलत भाऊ असे सर्वजण तरुणीच्या पनवेल येथील घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये या दोघांचा साखरपुडा आणि विवाह परेल येथील हॉलमध्ये पार पडला होता. लग्नानंतर तरुणी आपल्या पतीसह महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेली असताना पतीने तिला शारिरीक सुख देऊ शकत नसल्याचे सांगितले होते. तसेच त्याला शरीरसंबंध ठेवणे घाण वाटत असल्याचे सांगून त्याने तिच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली होती.
महाबळेश्वर येथून दोघे मुंबईत परतल्यानंतर तिच्या पतीने आणि सासरकडील मंडळींनी या नवविवाहितेला किरकोळ कारणावरुन बोलण्यास सुरुवात केली. तसेच तिला तिच्या आई- वडिलांच्या घरी निघून जाण्यास सांगण्यात येऊ लागले. मात्र, सदर तरुणी आपल्या आई-वडिलांकडे जात नसल्याने पतीने तिला शिवीगाळ करुन तिला छळण्यास सुरुवात केली. यादरम्यान सदर तरुणीने आपल्या नपुंसक पतीसोबत शरीर सुखासाठी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या गोष्टीची घाण वाटत असल्याचे सांगून तिचा पती तिच्यापासून दूर जात होता. त्यामुळे या तरुणीने आपल्या नपुंसक पतीला ठाणे येथे औषधोपचारासाठी देखील नेले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यामध्ये वंध्यत्व असल्याचे सांगितले होते. तसेच त्यासाठी त्याला औषध गोळ्या देखील दिल्या होत्या. मात्र या तरुणीच्या पतीने त्या गोळ्या घेण्यास नकार दिला होता. सदर तरुणी आपल्या पती सोबत फक्त सव्वा महिने राहिली. त्यानंतर होळीनिमित्त ती आपल्या माहेरी आली असताना, तिने आपला पती नपुंसक असल्याची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली होती. त्यामुळे या तरुणीच्या आई-वडिलांनी तरुणीच्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना संपर्क साधला असता, त्यांनी मुलीला सासरी पाठविल्यास तिला मारुन टाकण्याची धमकी दिली.
यानंतर या तरुणीचे सासरकडील नातेवाईक बोलणी करण्यासाठी तिच्या पनवेल येथील घरी गेले असताना त्यांनी तिचा पती नपुंसक असून त्याला काही जमणार नसल्याचे सर्वांसमोर सांगितले होते. तसेच तरुणी जर सासरी आली तर तिचा घातपात होईल, अशी भिती देखील दाखविली होती. त्यानंतर या तरुणीने खांदेश्वर पोलीस ठाणे तसेच महिला आयोगाकडे याबाबत लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने खांदेश्वर पोलिसांनी सदर तरुणीच्या पतीसह तिच्या सासरकडील मंडळीविरोधात फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply