Breaking News

पनवेलमध्ये अज्ञात त्रिकुटाने अॅम्ब्युलन्सचालकाला लुटले

पनवेल : वार्ताहर – रिक्षामधून आलेल्या अज्ञात त्रिकुटाने अपघातग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स चालकाला मारहाण करुन त्याच्याजवळ असलेल्या रोख रक्कमेसह मोबाइल फोन व टॅब असा सुमारे 33 हजारांचा ऐवज लुटुन पोबारा केल्याची घटना पनवेल येथे घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

या घटनेतील पारदार गजानन दळवी हे माणगाव येथे राहण्यास असून ते 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सवर चालक म्हणुन कामाला आहेत. दळवी हे माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातून कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णाला डायलिसीस करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात घेऊन गेले होते. या रुग्णाला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दळवी रिकामी अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन माणगाव येथे परतत होते. दळवी पनवेलमध्ये आले असताना, त्यांची अ‍ॅम्ब्युलन्स उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात चालक दळवी यांना दुखापत झाली नाही, मात्र अ‍ॅम्ब्युलन्सचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दळवी यांनी आपल्या सुपरवायझरला याबाबत माहिती दिल्यानंतर ते मदतीची वाट पहात अ‍ॅम्ब्युलन्स जवळ उभे राहिले. याचवेळी त्या ठिकाणी रिक्षामधून आलेल्या तिघा लुटारुंनी दळवी यांना धमकावून त्यांना

मारहाण केली.

त्यानंतर या लुटारुंनी त्याच्याजवळ असलेली रोख रक्कम, मोबाइल फोन, टॅब असा सुमारे 33 हजारांचा ऐवज लुटून रिक्षामधून पोबारा केला. त्यानंतर दळवी यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच चालक दळवी यांनी दिलेल्या रिक्षाच्या क्रमांकावरुन लुटारुंचा शोध सुरु केला आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply