रसायनी : प्रतिनिधी
सम्यक सामाजिक संस्थेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त मोहोपाडा पोलीस चौकीजवळ पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी मोहोपाडा बाजारपेठेत येत असतात त्यांना पिण्याचे थंडगार पाणी उपलब्ध व्हावे याकरिता मोफत थंड पाण्याचे जार ठेवून पाणपोई सुरू केली आहे.
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र असून या परिसराची सुसज्य बाजारपेठ म्हणून मोहोपाडा शहराची ओळख आहे. परिसरातील आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोहोपाडा बाजारपेठेत येत असतात. येथे पाणपोईची व्यवस्था नसल्याने आपली तहान भागविण्यासाठी मिनरल वॉटर बाटली विकत घेऊन आपली तहान भागवावी लागते. ही समस्या रसायनी परिसरातील समाजसेवक तथा सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी लक्षात घेतली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा पोलीस चौकीजवळ थंडगार पाणपोईची व्यवस्था करून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. या पाणपोईचे उद्घाटन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सरपंच कृष्णा पारंगे, अॅड. डी. टी. दांडगे आदी मान्यवर, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक संस्थेच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.