Breaking News

महाडमध्ये कार अपघात; एक ठार, दोघे जण जखमी

महाड : प्रतिनिधी

महाड-रायगड मार्गावर नाते खिंड येथे झालेल्या कार अपघातात एक जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. एका पाण्याच्या डबक्यात कार उलटून मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला.

महाडमधील व्यावसायिक नितीन मणिलाल मेहता, बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर आणि महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस मंगळवारी रात्री महाड-रायगड मार्गावरून जात होते. त्यांची कार नाते खिंड येथे आली असता, समोरील बाजूला अचानक जनावरे आल्याने चालक नितीन मेहता यांचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला उलटली. साचलेल्या डबक्यात पाणी असल्याने मेहता (वय 56) यांचा मृत्यू झाला, तर शैलेश सणस (वय 49) आणि योगेश कळमकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर महाडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नितीन मेहता यांच्या निधनाने महाडमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. एक मनमिळावू व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते. रोटरी क्लब आणि इतर संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कामातदेखील सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुनील अवसरमोल करीत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply