Breaking News

शिवसेनेचा दावा मान्य नाही!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील सत्तापेचावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली बाजू प्रथमच मांडली आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे, मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप शहा यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून घेऊ, असे काहीही ठरलेले नव्हते, अशा स्पष्ट शब्दांत शाह यांनी शिवसेनेचा दावा अमान्य केला.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शहा यांनी अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे मी भाषणांमध्ये अनेकदा बोललो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा त्यांच्या सभांमधून हेच सांगितले. स्वतः फडणवीसही सांगत होते. त्या वेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर मात्र शिवसेनेने अटी बदलल्या. त्यांच्या नव्या अटी आम्हाला मान्य नाहीत, असे शहा म्हणाले. बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली ते सांगणे मला योग्य वाटत नाही, कारण माझ्या पक्षाचा माझ्यावर तसा संस्कार नाही असे सांगून आम्ही शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही, तर शिवसेनेने आमची साथ सोडली, असे शहा यांनी नमूद केले.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर महाराष्ट्रातील विरोधक टीका करीत आहेत की, आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही, मात्र त्याला काहीही अर्थ नाही. ते फक्त राजकारण करीत आहेत. 18 दिवस सत्तास्थापनेसाठी कुठेही लागलेले नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करून सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी जावे आणि सरकार स्थापन करावे, असा टोला अमित शहा यांनी लगावला.

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली नसती, तर आमच्यावर हा आरोप झाला असता की भाजपला काळजीवाहू सरकार चालवायचे आहे. राज्यपालांनी प्रत्येक पक्षाला संधी दिली, मात्र एकही पक्ष त्या संधीचा उपयोग करून सत्तेचा दावा सिद्ध करू शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री 8.30 पर्यंत वेळ देण्यात आली होती, मात्र त्यांनी सकाळी 11च्या दरम्यान राज्यपालांना फोन करून मुदतवाढ मागितली. राज्यपालांनी त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, कारण राज्यात पेच निर्माण झाला होता. राज्यपालांचे काही चुकले आहे असे मुळीच वाटत नसल्याचेही शाह यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply