पनवेल : वार्ताहर
हायड्रो कार्बन ऑईल हे कुठेतरी चोरून अथवा अपहार करून तालुक्यातील साईराज लॉजिस्टिक येथे विक्री करीत असताना पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पनवेल परिसरात हायड्रो कार्बन ऑईलच्या नावाखाली डिझेलची आयात केली जाते. यासाठी कोणताही वैध परवाना काढण्यात येत नाही. अशा प्रकारे गुन्हे वाढीस लागल्याने उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्यासह सहाय्यक निरीक्षक नितीन पगार, उपनिरीक्षक आकाश पवार यांच्या पथकाने आजिवली गावाच्या हद्दीत साईराज लॉजिस्टिकच्या आतील भागात छापा टाकला. या वेळी त्याठिकाणी एका टँक मधून दुसर्या टँकरमध्ये व ड्रममध्ये ऑईल ट्रान्सफर करत असल्याचे निदर्शनास आले, तसेच या गुन्ह्यातील आरोपी हे सील तोडून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने एका टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये व ड्रममध्ये ऑईल ट्रान्सफर करत असत. सदरच्या गुन्ह्यात वापरलेले तीन मोटर, दोन नोजल पाइप, चार टँकर, एक आयशर टेम्पो, ड्रम, दोन डिस्पेन्सर मशीन असा एकूण एक कोटी आठ लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत अमोल शिंदे (40, रा. नेरुळ), बुद्धभूषण बाने (25, रा. परभणी), संतोष कुमार (34, रा. बरयपूर, उत्तरप्रदेश), सतीश चव्हाण (30, रा. आष्टी), संदीप म्हस्के (30, रा. आष्टी), आप्पासो नलावडे (42, रा. कामोठे) व मनजीतकुमार पुरणसिह चौधरी (49, रा.पालघर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पनवेल तालुका पोलिसांकडून केला जात आहे. यांच्या अटकेमुळे एक मोठी टोळी पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केली आहे, तसेच अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्यामुळे उघडकीस येणार असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.