आरोग्यसेविकांनी मुख्यालयालगत राहण्याची नागरिकांची मागणी
पाली-बेणसे ः प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्यसेवेतील आरोग्यसेविकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असतानाही सुधागड तालुक्यातील बहुसंख्य आरोग्यसेविका आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून दूर वास्तव्यास आहेत. परिणामी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. त्याबरोबरच दूरवर राहत असल्याने आरोग्यसेविकांकडूनही उत्तम सुविधा देण्यास कसूर राहते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णांना वेळच्या वेळी उपचार मिळावेत याकरिता आरोग्यसेविकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची मागणी सुधागडवासीयांकडून होत आहे. या मागणीबाबत पाली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी तत्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुधागड तालुका आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. येथील गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी व सर्वसामान्य जनेतेची उपचाराकरिता संपूर्णतः मदार पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे, परंतु सद्यस्थितीत जिल्हा परिषद रायगड अंतर्गत पाली व जांभूळपाडा हे मुख्य आरोग्य केंद्र व याअंतर्गत येणार्या उपकेंद्रातील मागील वर्षभरापासून रिक्त असलेली कर्मचार्यांची पदे, रुग्णवाहिकेची समस्या यामुळे आरोग्यसेवा पूर्णतः कोलमडली आहे. या ठिकाणी केवळ नावाला उपकेंद्र मात्र रुग्णांना कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नसल्याची वास्तव परिस्थिती आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणार्या रुग्ण तसेच गर्भवती महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. याबरोबरच आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक तितका औषधांचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी दिवसागणिक वाढत आहेत. पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचल्यावर त्या ठिकाणी आरोग्यसेविका असतीलच याचा नेम नाही.