उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जासईत एका दगडखाणीच्या कार्यालयाच्या पाठीमागे आलेल्या एका अजस्त्र अजगराला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आनंद मढवी आणि विनीत मढवी यांनी पकडून चिर्ले येथील डोंगरावर सोडून जीवदान दिले आहे.
मनोहर पाटील यांच्या जासई येथील दगडखाण व्यवसायाच्या कार्यालयापाठीमागे काम करणार्या कामगाराला एक अजस्त्र अजगर असल्याचे आढळून आले. अजगर दिसल्याने सर्व कामगार भयभीत झाले. त्यांनी तत्काळ त्यांच्या मालकांना ही बातमी फोनवर सांगताच त्यांनी चिर्ले येथील सर्पमित्र आनंद मढवी यांना फोन करून कार्यालयाच्या पाठीमागे अजगर असल्याची कल्पना दिली. काही मिनिटांतच सर्पमित्र तेथे जाऊन त्या अजस्त्र अजगराला हुशारीने पकडण्यात आले.
यानंतर सर्पमित्राकडून वनखात्याला याची कल्पना देण्यात आली. वनखात्याचे अधिकारी शशांक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र रक्षक सूरदास धांडे, किरण देवकर, मिलिंद भोईर, माया भोसले यांनी या अजगराचे मोजमाप घेतले. या अजस्त्र अजगराची अंदाजे लांबी 11 फूट दोन इंच, तर याचे वजन 38 किलोपर्यंत असल्याचे वनाधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.
या अजगराची तपासणी करून त्याला वनखात्याच्या अधिकार्यांनी सुखरूप जंगलात सोडलेे. या वेळी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी, सदस्य दिलीप मढवी, महेश भोईर,पंकज घरत, सुमित मढवी, विनीत मढवी, राजेश ठाकूर, प्रतीक कोळी, ऋषिकेश ठाकूर, तेजस पाटील, आदर्श म्हात्रे, करण म्हात्रे, हरेश म्हात्रे, मनीष मढवी आदी उपस्थित होते.