Breaking News

पाकिस्तानी मसाल्यांच्यावर व्यापार्यांची बंदी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान चालणार्‍या व्यापारावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातून पाकिस्तानात जाणारा टोमॅटो आणि अन्य कृषी माल तिकडे पाठविण्यास येथील व्यापार्‍यांनी आधीच नकार दिला आहे. त्यातच आता पाकिस्तानातून येणारा कृषी माल, मसाल्याचे पदार्थ भारतात न मागविण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही त्याचा परिणाम दिसू लागला असून येथील व्यापार्‍यांनी तिथून माल न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून येणार्‍या कृषी मालाला आता बाजारात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पाकिस्तानातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खजूर येतो. शिवाय काळे मीठ, कमल कट्टा यासारखे काही मसाल्याचे पदार्थही येतात. वाघा बॉर्डरवरून उत्तर प्रदेश, बिहारमार्गे हा कृषिमाल येत असतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात काही व्यापार्‍यांकडे हे पदार्थ येतात आणि त्यांची विक्री केली जाते, मात्र मागील काही दिवसांपासून सुरू असलेली देशाच्या सीमेवरील परिस्थिती आणि एकूणच देशातील वातावरण पाहता येथील व्यापार्‍यांनी पाकिस्तानातून माल मागविणे बंद केले आहे. पाकिस्तानातून आपल्याकडे रमजानच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात खजूर, खारीक येतो. त्या व्यतिरिक्त अन्य काळात खजूर आणि अन्य मसाल्याचे पदार्थ येतात, मात्र त्यावर आता पूर्णविराम देण्यात आल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

देशभक्तीच्या आणि देशातील सद्यस्थितीच्या कारणाबरोबरच पाकिस्तानातून येणार्‍या मालावरील आयात शुल्कातही वाढ झाली आहे. पूर्वी या कृषी मालावरील आयात शुल्क सरासरी 10 ते 20 टक्के होते, मात्र आता ते वाढवून 200 टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे. व्यापार्‍यांनी पाकिस्तानातून माल मागविणे बंद केले आहे.

-कीर्ती राणा, नवी मुंबई  मर्चंट चेंबरचे अध्यक्ष

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply