कळंबोली : प्रतिनिधी
महानगर गॅस कंपनीकडून घरगुती पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून या कामा बाबत व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी संपूर्ण रस्तेच बंद केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा जनतेला त्रास देण्याचे उद्योग कंपनीने त्वरीत थांबवावे अन्यथा कंपनी विरोधात जनआंदोलन करावे लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष
गणेश पाटील यांनी दिला आहे. सिडकोच्या शहरामध्ये महानगर गॅस कंपनीने घरगुती गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू केले असून काही ठिकाणी जोडणी होवून गॅस कनेक्शन चालू करण्यात आले आहे. आता पाईप लाईन टाकण्याचे काम खांदा कॉलनीत चालू असून दिशाहीन व्यवस्थापनामुळे मनमानीपणा करत एक दोन दिवस रस्तेच बंद करत आहेत. त्यामुळे नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर वळसा घालून जावे लागते. यात त्यांचा वेळ व पैसा वाया जात असून त्रास सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी रस्ते खोदणे नागरिकांच्या जीवावर बेतणारे आहे. महानगर गॅस कंपनीने नागरिकांना त्रास होईल असे काम बंद करावे अन्यथा नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले असा इशारा गणेश पाटील यांनी दिला आहे.