Breaking News

मापात पाप; 26 लाखांचा दंड ; वैधमापनशास्त्र विभागाची धडक कारवार्ई

अहमदनगर ः प्रतिनिधी

वजनमापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तूंंची विक्री करताना मापात पाप करणार्‍या 613 विक्रेत्यांंवर वैधमापनशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करीत त्यांना 26 लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई झालेल्यांत 443 वजनमापाची प्रकरणे असून, 170 कारवाया या पॅकबंद वस्तूंच्या विक्रीसंदर्भातील आहेत़. वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल देणे, नादुरुस्त वजनमाप वापरणे, वजनमापाची पडताळणी करून न घेणे आदी बाबी आढळून आल्या आहेत.

दुकानातून पॅकबंद वस्तूंची विक्री करताना किमतीत खाडाखोड करणे, मालाच्या वजनापेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे घेणे अशी 170 प्रकरणे वैधमापन विभागाला तपासणी मोहिमेत आढळून आली आहेत. या विक्रेत्यांवर वैधमापनशास्त्र अधिनियम 2009प्रमाणे कारवाई करण्यात आली, तर सहा जणांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयात निकाल होऊन त्यांना 17 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वैधमापनशास्त्र विभागाच्या या धडक कारवाईनंतर विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • वर्षभरात अवघ्या 14 तक्रारी

वैधमापनशास्त्र विभागाविषयी शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना विशेष माहिती नाही. वजनमापा संदर्भात या विभागाकडे मागील वर्षभरात अवघ्या 14 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बहुतांश ठिकाणी वजनात फसवणूक झाली तरी ग्राहक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात़

-पेट्रोलपंपावर माप ठेवणे सक्तीचे पेट्रोलपंपावर इलेक्ट्रॉनिक माप व्यवस्थित असले तरी पेट्रोल टाकणार्‍या कर्मचार्‍याकडून कमी पेट्रोल दिले जाऊ शकते. अशा वेळी ग्राहकांना शंका आली तर प्रत्येक पेट्रोलपंपावर हाताने पेट्रोल मोजता येतील अशी मापे ठेवलेली असतात, तसेच अशी मापे ठेवणे सक्तीचे आहे. ग्राहकांनी त्या मापात विकत घेतलेल्या पेट्रोलची पडताळणी करावी. यात फसवणूक झाली असेल तर तत्काळ वैधमापनशास्त्र विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक अलकेश गेटमे यांनी केले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply