Breaking News

महानगर गॅसचा रात्रीस खेळ चाले…

अंधारातही पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू

खालापूर : अरुण नलावडे

मुंबई-पुणे महामार्गालगत पनवेल ते खोपोलीदरम्यान महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. त्यासाठी महामार्गाच्या बाजूने तीन मीटर अंतरावर खोदकाम सुरू असून, रात्रीच्या वेळेस कुठलीही दक्षता न घेता गॅस पाईप जोडण्यात येत आहेत. त्याकरिता लागणारे जेसीबी मशीन, पोकलण, हायड्रा तसेच वेल्डिंग करण्याचे साहित्य मार्गामध्येच ठेवले जात असल्याने वाहनचालकांना याचा फटका बसत आहे, तर या यंत्रसामुग्रीला धडक दिल्याने दोन मोटरसायकलस्वार जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र महानगर गॅस कंपनीला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. आमच्याकडे सर्व ना हरकत दाखले असल्याचे सांगून बिनबोभाटपणे खोदकाम व पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.पनवेल ते खोपोलीदरम्यान महानगर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी गेल्या काही दिवासांपासून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत खोदकाम तसेच पाईप जोडण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खालापूरच्या तहसीलदारांनी खोदकाम सुरू असताना कारवाई करून महानगर गॅस कंपनीला एक लाख 72 हजार रुपयांची दंडात्मक नोटीस बजावली होती, तर रात्रीच्या वेळेस काम सुरू असताना खालापूर पोलिसांनीही या कंपनीला समज दिली होती. तरीही पाईप जोडणीचे काम रात्रीच्या वेळेस बिनबोभाटपणे सुरू आहे अंधारात कुठलीही मशनरी चालवण्यास शासनाची बंदी आहे, तर महामार्गालगत खोदकाम करण्यास किंवा यंत्रसामुग्री महामार्गामध्ये ठेवण्यास रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते आणि राष्ट्रीय महामार्ग या खात्यांची बंदी आहे. मात्र काही कागदपत्रे दाखवून या कामास परवानगी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी दिवस मावळल्यानंतर ते दिवस उजाडेपर्यंत अशा प्रकारचे काम करण्यास पूर्ण बंदी असल्याचे समोर आले आहे. महानगर गॅस कंपनीचे अधिकारी अफ्रोन मज्फर आणि दिपल दास यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,  अंधारात काम करण्यास कोणासही परवानगी नाही. याची आम्ही दखल घेतली आहे. असे असले तरी मागील महिनाभरापासून सदर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम रात्रीच्या वेळेसही सुरू आहे. त्यामुळे या कामात एखादी दुर्घटना किंवा मोठा अपघात घडल्यास त्याला महानगर गॅस कंपनी जबाबदार असल्याचे हाळगाव व स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply