Sunday , February 5 2023
Breaking News

नागोठण्यात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने शासकीय दाखल्यांचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी

सामाजिक कार्याच्या माध्यमातून शासकीय योजना उपेक्षितांपर्यंत पोहोचविणे हे एक सत्कार्यच आहे व असे कार्य डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान करत असल्याने हे प्रतिष्ठान निश्चितच गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार रोह्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी गुरुवारी (दि. 9) नागोठणे येथे काढले.

नागोठणे येथील जोगेश्वरी रंगमंचावर गुरुवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने विभागातील 700 नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. माने उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमात शासकीय यंत्रणांनासुद्धा सहभागी करून घ्यावे, असे आवाहन डॉ. माने यांनी या वेळी केले.  ज्येष्ठ नागरिक दाखला मिळविण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे अत्यावश्यक असते. ते नसल्यास त्यांना ज्येष्ठ नागरिक दाखल्यापासून वंचित राहावे लागते. वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी या प्रतिष्ठानने ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करावे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी अलिबागला घेऊन जाण्याकरिता रोहे तहसीलदार मोफत बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.

दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. संबंधित शाळा तसेच डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्र येऊन समन्वय साधला, तर निकालानंतर नियोजनाद्वारे गावनिहाय दाखले देण्याचा उपक्रम राबविणे शक्य होऊ शकते, अशी सूचना त्यांनी या वेळी केली.

प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र वारे यांनी केले. या वेळी महसूल विभागाच्या वतीने चावडी वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव, रोहे पंचायत समितीचे स्थानिक सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, तलाठी अनंत म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, सुनीता जाधव, चंद्रकांत केंडे, शांताराम शहासने आदी मान्यवर उपस्थित होते. गौरव गोळे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील तलाठी अनंत म्हात्रे, नंदकुमार पाटील, शिवाजी केंद्रे, मंगेश साळवी आणि कोतवाल मंडळींनी विशेष सहकार्य केले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply