
रायगड जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या 11 महिन्यांत जिल्ह्यात 17 हजार 696 जणांना श्वानदंश झाला आहे. दर महिन्याला सरासरी दीड हजारांहून अधिक लोकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. तीन वर्षांत 52 हजार लोकांना श्वानदंश झाला आहे. ही एक चिंतेची बाब आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत आणि उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अधिक आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग शहरी तालुक्यात श्वानदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही समस्य गंभीर बनत आहे. हा वाढता उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना करावीच लागणार आहे. खोपोली शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सात जणांचा चावा घेतला. काही दिवसांपूर्वीच भानवज परिसरात एका कुत्र्याने आठ जणांचे लचके तोडले होते.
पनवेलमध्ये शाळकरी मुलाला कुत्र्यांनी लक्ष्य केले होते. वारंवार घडणार्या घटनांमुळे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याचे लक्षात येते. जिल्ह्यात 2017मध्ये 15 हजार 640 जणांना श्वानदंश झाला. 2018मध्ये 18 हजार 742 जणांचे भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले, तर 2019मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 17 हजार 696 जणांना श्वानदंश झाला आहे. म्हणजेच तीन वर्षांत 52 हजार 78 लोक या भटक्या कुत्र्यांचे लक्ष्य ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत किती वाढली आहे हे स्पष्ट होते. पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग शहरी भागात श्वानदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे.गेल्या 11 महिन्यांत पनवेल येथे 4205, अलिबाग येथे 2232, पेण येथे 2158, कर्जत येथे 1840, उरण येथे 1715, खालापूर येथे 1623, तर रोहा येथे 1294 श्वानदंशाची प्रकरणे समोर आली आहेत. मुरूड आणि तळा तालुक्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व तालुक्यांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. भटक्या कुत्र्यांना पकडणे हे मोठे जिकिरीचे काम ठरते. कुत्री आक्रमक होऊन हल्ला करत असल्याने
नगरपालिकेचे कर्मचारी यासाठी पुढे येत नाहीत. निर्बिजीकरणानंतर आठ दिवस कुत्र्यांची काळजी घेणे गरजेचे असते. या कुत्र्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न नगरपालिका प्रशासनासमोर असतो. त्यामुळे अनेकदा नगरपालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे हा प्रश्न अधिकच जटील होत असल्याचे दिसून येते. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे हा एकच उपाय सध्या उपलब्ध आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाहीत. नगरपालिका आणि महानगरपालिकांकडे यासाठी आवश्यक यंत्रणा नाही हे एक कारण सांगितले जाते. काही सामाजिक संस्था कुत्र्यांचे निर्बिजीकरण करतात. त्यांच्या मदतीने निर्बिजीकरण करता येते. कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणावर सुरू करायला हवी. रायगड जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे हीदेखील एक चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 3584 जणांना सर्पदंश झाला आहे. यंदा सर्पदंशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत साप चावण्याच्या 8565 घटना घडल्या आहेत. यात 2017मधील 2450, 2018मधील 2531, तर 2019मधील 3584 घटनांचा समावेश आहे. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे साप बाहेर पडतात. याच काळात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण वाढते. जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली. वादळी पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळेही सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. सर्पदंश झाल्यानंतर त्याबाबतची भीती तसेच गैरसमजामुळे तंत्रमंत्राच्या साहाय्याने त्याचा उतारा करण्याकडेही अनेकांचा कल असतो.ही दिरंगाई अनेकदा रुग्णाच्या जीवावरही बेतते. होमोलायटिक आणि न्यूरोटॉक्सिन या दोन प्रकारांमध्ये सर्पदंशाची विभागणी होत असून प्रत्येक प्रकारानुसार त्याची उपचार पद्धतीही भिन्न असते. अनेकदा ग्रामीण भागातील डॉक्टरांना याबाबतची माहिती नसते. त्यामुळे उपचारात उशीर होतो आणि परिस्थिती अधिकच बिकट होते. नव्या उपचार पद्धतीप्रमाणे सर्पदंश झाला असता तातडीने उपचार सुरू करण्यात येतात, तसेच शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेत त्यासाठी स्वतंत्र औषधे दिली जातात. त्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते. वास्तविक सर्पदंश होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे.
तरीदेखील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील औषधे उपलब्ध नसतात. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावतो. प्राथमिक आरोग्य केंद्रातच सर्पदंशावरील औषधे उपलब्ध करून दिली पाहिजेत. सापांबद्दल अजूनही बर्याच गैरसमजुती आणि अंधश्रद्धा आहेत. याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
-प्रकाश सोनवडेकर, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper