Breaking News

विकृतीला रोखणार कसे?

‘ढोर, गंवार, शुद्र, पशु और नारी, सकल है ताडन के अधिकारी’ हा शतकानुशतके चालत आलेला दृष्टिकोन समाजामध्ये इतका खोलवर मुरलेला आहे की विशेषत: स्त्रियांबाबतचा हा विकृत दृष्टिकोन विषवल्लीसारखा उपटून फेकून देणे हे कठीण काम होऊन बसले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांचे समाजातील स्थान अधिक उंंच व्हावे यासाठी नवनव्या योजना राबवल्या. सामाजिक प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले. मोदी सरकारच्या या प्रयत्नांना भरीव यश मिळताना दिसत आहे. असे असतानाच हिंगणघाट या महाराष्ट्रातील गावातून ती भयंकर बातमी यावी ही बाब अस्वस्थ करणारी आहे.

राजधानी दिल्लीमध्ये आठ वर्षांपूर्वी घडून गेलेल्या निर्भया बलात्कार कांडाचे गुन्हेगार फाशीच्या शिक्षेला हुलकावण्या देत आहेत. कायद्यातील पळवाटा या गुन्हेगारांच्या आजवर कामी आल्याचे स्पष्ट दिसत असल्याने देशातील सर्वच सुजाण नागरिक अस्वस्थ झाले असतील. कधी एकदा या गुन्हेगारांना फासावर लटकावल्याची बातमी पाहायला किंवा वाचायला मिळते अशा अपेक्षेत पूर्ण देश बुडालेला असताना अशाच प्रकारच्या एका निर्दयी घटनेची बातमी महाराष्ट्रातून येते यासारखे दुर्दैव नाही. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नंदेरी चौकात भर दिवसाढवळ्या एका नराधमाने कुठलीही दरकार न बाळगता एका शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात सदर तरुणी गंभीररित्या भाजली असून नागपूर येथील ऑरेंज सिटी इस्पितळात ती मृत्यूशी झुंज देत आहे. आपल्या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न दिल्याची शिक्षा म्हणून नगराळे नावाच्या नराधमाने हा प्रकार केला. या घटनेचा निषेध करावा तितका थोडा आहे. दीपिका पडुकोण हिने अभिनय केलेला ‘छपाक’ नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी त्याचे कौतुक देखील केले. लक्ष्मी अग्रवाल नावाच्या एका अ‍ॅसिड बळी तरुणीच्या जीवनकहाणीवर हा चित्रपट बेतलेला होता. या चित्रपटाची आठवण काढण्याचे कारण एवढेच की हिंगणघाटमध्ये घडलेली घटना लक्ष्मी अग्रवालच्या त्या कहाणीशी मिळतीजुळती आहे. म्हणजेच स्त्रियांवरील अत्याचारांचा हा सिलसिला दशक उलटून गेले तरीही सुरुच आहे. स्त्री ही कमअस्सल जातीची असून तिने आपले ऐकलेच पाहिजे हा परंपरागत पुरुषी दृष्टिकोन अशा घटनांमधून विकृत वळण घेताना दिसतो. समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळणे ही नवीन बाब नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून कर्तृत्वाची नवनवी क्षितिजे पादाक्रांत करणार्‍या तमाम स्त्री वर्गाला आजही पुरुषप्रधान संस्कृतीचे जीवघेणे चटके बसत आहेत. कर्तृत्वाच्या मोजपट्टीवर पुरुषांपेक्षा अधिक सरस असलेल्या स्त्रियांनाही आपल्या समाजामध्ये समानतेची वागणूक मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुंबईसारख्या महानगराच्या व आसपासच्या प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ही चिंतेची बाब ठरली आहेच. त्यासंदर्भात पोलिसांनी नवनव्या उपाययोजना वेळोवेळी राबवल्या असल्या तरी आजही रात्री उशीरा या परिसरात स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करू शकतात असे ठामपणे म्हणता येणार नाही. कारण हा प्रश्न जितका कायदा व सुव्यवस्थेचा आहे त्यापेक्षाही अधिक तो स्त्रियांबाबतच्या विकृत दृष्टिकोनाचा आहे. बलात्कार, अ‍ॅसिड हल्ला, जिवंत जाळणे या अमानुष प्रकारांना रोखायचे असेल तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पुरुषी मानसिकता बदलण्याकरिता प्रभावी मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply